ख्रिश्चन मिशनरी शाळेच्या कृत्यामुळे संतापाची लाट, दोन शिक्षकांवर एफआयआर
.@ भोपाळ / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशमधील शहर गुणा येथील एका ख्रिश्चन मिशनरी शाळेने एका हिंदू विद्यार्थ्याला त्याने ‘भारत माता की जय’ असे म्हटल्याने शिक्षा दिल्याची निषेधार्ह घटना घडली आहे. या विद्यार्थ्याला त्याच्या दोन शिक्षकांनी जमिनीवर बसण्याची शिक्षा दिली. यामुळे हिंदू समाजात संतापाची लाट उसळली असून पालक संघटना आणि हिंदू संघटनांनी शाळेविरोधात उग्र निदर्शने केली. या दोन शिक्षकांविरोधात एफआयआर सादर करण्यात आला असून पुढील चौकशी केली जात आहे.
पिडीत मुलाचे पिता रोहित जैन यांनी या घटनेची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. हा मुलगा भोपाळ येथील ख्राईस्ट स्कूलमध्ये शिकतो. गेल्या बुधवारी शाळेतील प्रार्थनेनंतर त्याने भारत माता की जय अशी घोषणा दिली. त्यामुळे त्याचे शिक्षक संतप्त झाले. त्यांनी त्याला धमकावले आणि अर्वाच्य शब्दांमध्ये समज दिली. इतकेच नव्हे, तर त्याला सलग चार पिरिएडस् जमिनीवर बसून शिकण्याची शिक्षा दिली. याचा गंभीर परिणाम मुलाच्या मनावर झाला. दुःखावेगात घरी आल्यानंतर त्याने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. अखेर मातापित्यांनी त्याची समजूत घातली तेव्हा त्याने घडलेला प्रकार कथन केला. त्याला शिक्षा देणाऱया शिक्षकांची नावे जस्टीन आणि जस्मिना खातून अशी आहेत.
संतापाची लाट
ख्रिश्चन शाळेत घडलेल्या या घृणास्पद घटनेमुळे हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे. अनेक हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन व्यवस्थापनाला धारेवर धरले. त्यांनी तेथे उग्र निदर्शने केली. अखेर व्यवस्थापनाला नमते घ्यावे लागले. पिडीत विद्यार्थ्याला शिक्षा देणाऱया शिक्षकांविरोधात एफआयआर सादर करण्यात आला आहे. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पालक संघटनांनीही केली आहे. हिंदू संघटनांनी गुरुवारी दिवसभर शाळेत निदर्शने केली आणि हनुमान चालिसाचे पठणही केले. प्रशासनाने अद्यापही या विद्यार्थ्यावर झालेल्या अन्यायासंबंधी क्षमायाचना केलेली नाही. त्यामुळे व्यवस्थापनावरच कठोर कारवाई करावी आणि धडा शिकवावा, ही मागणी केली जात आहे.
शाळा बळकावलेल्या जमिनीवर
या शाळेच्या व्यवस्थापनाने सरकारी जमिनीवर अवैधरित्या कब्जा करुन शाळा स्थापन केली आहे, असा आरोप आहे. माजी आमदार राजेंद्र सलुजा यांनी यासंबंधीची कागदपत्रे सादर केली असून ही जमीन सरकारने ताब्यात घ्यावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने शाळेच्या परिसराची पाहणी केल्यानंतर दोन एकर सरकारी जमिनीवर शाळेने ताबा मिळविल्याचे स्पष्ट झाले. आता ही जमीन पुन्हा मिळविण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाईला प्रारंभ केला आहे.
हिजाब समर्थक आता कोठे आहेत?
कोणत्याही शाळेत मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब परिधान करण्याची अनुमती असावी कारण हा त्यांच्या वेषभूषा निवडीचा अधिकार आहे. तो शाळेच्या नियमांपेक्षाही महत्वाचा आहे. मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. हिजाबकडे नको, असा शहाजोग उपदेश करणारे तथाकथित पुरोगामी आता कोठल्या बिळांमध्ये दडून बसले आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे. विद्यार्थ्याला ‘भारत माता की जय’ ही देशभक्तीपूर्ण घोषणा देण्याचा अधिकार नाही का? अशी रास्त विचारणा होत असून हिजाबच्या समर्थकांची आता दातखिळ का बसली आहे, अशी विचारणा हिंदूंकडून केली जात आहे. त्याला हे दांभिक पुरोगामी कोणते उत्तर देणार याकडे बारकाईने पाहिले जात आहे. अद्यापपावेतो कोणत्याही पुरोगाम्याने गुणा येथील शाळेतील घटनेचा निषेध केलेला नाही. यातून त्यांचे बिंग बाहेर पडले आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्यक्त होत आहे.









