जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रकारामुळे संताप
प्रतिनिधी / बेळगाव
बांधकाम कामगारांच्या मुलांना टॅब देण्यात येणार आहेत. त्या टॅबचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गुरुवारी होते. तालुक्यातील बांधकाम कामगारांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गुरुवारी बोलाविण्यात आले होते. त्यामुळे आपल्या मुलांसह पालक उपस्थित होते. मात्र, चार तास ताटकळत थांबूनदेखील त्यांचा कोणीच विचार केला नाही. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बांधकाम कामगारांना विविध सुविधा दिल्या जातात. त्या सुविधा देताना बऱ्याच वेळा त्याचा दुरुपयोग केला जात आहे. टॅब देण्यासाठी बांधकाम कामगारांच्या मुलांची निवड केली गेली आहे. निवड केलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित रहा, असे सांगण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील विविध गावातून पालक आणि विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित होते.
अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही कोंडी
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांना याविषयी पूर्वकल्पना नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. कामगार कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आम्हाला कोणतीच मार्गसूची आली नाही, असे सांगितले. त्यामुळे कामगार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चांगलीच कोंडी झाली होती.
दरम्यान, भर उन्हामध्येच पालक आणि विद्यार्थी ताटकळत थांबले होते. बऱ्याच उशिरा काही विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले. मात्र, नियोजनाअभावी पालक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.









