माध्यमिक विद्यालयातील घटना : संशयित शिक्षक फरार, गुन्हा नोंद
फोंडा : फोंडा तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शारीरिक शिक्षकावर म्हार्दोळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सदर घटना 1 जुलै रोजी घडली होती, असे त्या विद्यार्थिनीने स्वत:च्या हस्ताक्षरात म्हार्दोळ पोलीस स्थानकात काल सोमवारी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. म्हार्दोळ पोलीस संशयिताच्या शोधार्थ विद्यालयात व घरी गेले असता तो तिथे सापडला नाही. या घटनेनंतर त्या विद्यार्थिनीवर सध्या शाळा सोडण्याची परिस्थिती ओढवलेली आहे. ती प्रचंड मानसिक तणावाखाली असून या घटनेनंतर तिच्या लहान बहिणीवरही परिणाम झालेला असून तिनेही शाळा सोडली आहे.
दोन महिन्यांपूर्वीची घटना
ही घटना साधारण दोन महिन्यांपूर्वी घडली होती. परंतू अजूनपर्यंत कोणतीच कारवाई विद्यालयातर्फे शिक्षकावर करण्यात आलेली नाही. तो शिक्षक अजूनही शाळेत काम करीत आहे. असा अतिप्रसंग झाल्यानंतरही त्या वादग्रस्त शिक्षकाला कामावर कसे ठेवण्यात आले? यावर मोठे राजकारण असल्याचा येथील ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला आहे. रेव्होल्युशनरी गोवन्सचे प्रेमानंद गावडे व विश्वेश नाईक यांनी पुढाकार घेत याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी त्वरित लक्ष घालून शिक्षकाला अटक करावी अशी मागणी केली आहे.
शिक्षकावर कारवाई का नाही केली?
संशयित शारीरिक शिक्षक हा वादग्रस्त असून यापूर्वीही अशी घटना घडल्याचे तक्रारीत नमूद केलेले आहे. मात्र त्यावर पडदा टाकण्यात आला होता. या शिक्षकाकडून विनयभंगाची घटना घडल्यानंतर विद्यार्थिनीने ही गोष्ट प्रथम एका शिक्षिकेला सांगितली होती. व्यवस्थापन आणि राजकीय दबावामुळे संशयित काही दिवसानंतर पुन्हा सेवेत रूजू झाला होता. घटनेबद्दल कुणाला सांगू नये म्हणून त्याने विद्यार्थिनीला धमकीही दिली होती.
मुख्याध्यापक, व्यवस्थापनही जबाबदार
आरजीचे विश्वेश नाईक म्हणाले की, विद्येच्या मंदिरात घडलेले हे संवेदनशील प्रकरण व्यवस्थितपणे हाताळण्यास शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक अपयशी ठरलेले आहेत. शारीरिक शिक्षकाला अभय देणाऱ्या व्यवस्थापक व मुख्याध्यापकाचीही जबानी नोंद करून घ्यावी. आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनीला बळ देण्याऐवजी वादग्रस्त शिक्षकाला अभय देण्याचा अपराध केलेला आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे या शाळेशी चांगले संबंध असल्याने त्यानी संशयित शिक्षकावर कठोर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ नारा देणाऱ्या भाजपा सरकारने तिला न्याय मिळवून द्यावा. याप्रकरणी पंतप्रधान कार्यालयाशीही पत्रव्यवहार करणार आहे, असे विश्वेश नाईक यांनी सांगितले. म्हार्दोळ पोलिसांनी संशयित शारीरिक शिक्षकाविरोधात भा.दं.सं. 354, गोवा बाल कायदा 2003 चे कलम 8 (2) व पॉस्को कायद्याचे कलम 12 आणि 8 अंतर्गत गुन्हे नेंदविण्यात आलेले आहेत. सध्या संशयित फरार असून पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हार्देळ पोलीस अधिक तपास करीत आहे.
तीन अल्पवयीनांवर अत्याचाराच्या नोंदी
म्हार्दोळ पोलीस स्थानकाच्या उद्घाटनाच्या केवळ तीन महिने उलटण्यापूर्वीच या पोलीस स्थानकाच्या हद्दीत मागील आठ दिवसांत तीन अल्पवयीनांवर अत्याचाराच्या घटना नोंद झालेल्या आहेत. लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघाजणांना अटक करण्यात आलेली आहे.









