दहावी परीक्षा निकाल; शिक्षण खात्याची डोकेदुखी
बेळगाव : दहावी विद्यार्थ्यांच्या निकालात सुधारणा व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सरकारने दहावीची परीक्षा तीन वेळा घेतली आहे. तीन वेळा परीक्षा देऊनही बेळगाव जिह्यात 12,385 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने शिक्षण खात्याची डोकेदुखी वाढली आहे. जिह्यातील दहावी परीक्षेचा निकाल सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रतिवर्षी वेगवेगळे प्रयत्न करीत असले तरी उद्दिष्ट गाठणे शक्य झालेले नाही. विद्यार्थ्यांची शाळेत गैरहजेरी, शिक्षकांची कमतरता, शाळेमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे दहावी निकालात बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिह्याला प्रगती साधता येणे शक्य झालेले नाही. यावर्षी दहावीची परीक्षा तीन वेळा घेऊन अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची संधी दिली, तरीही परीक्षा- 1, 2 व 3 दिलेल्या चिकोडी शैक्षणिक जिह्यात 7,007 व बेळगाव शैक्षणिक जिह्यात 5,378 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
शिक्षण सोडून कामाकडे
परीक्षा-1 व 2 मध्ये अनुत्तीर्ण झालेले 17,165 विद्यार्थ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा- 3 दिली होती. जुलै अखेरीस निकाल लागल्यानंतर यात 4,780 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल 12,385 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. यावरून जिह्याच्या शैक्षणिक विभागाची आणखी पीछेहाट झाल्याचे स्पष्ट होते. अनुत्तीर्ण विद्यार्थी शिक्षण अर्ध्यावरच सोडून एखादे काम करण्याकडे वळण्याची शक्यता अधिक आहे. हे विद्यार्थी कदाचित बालकामगार होऊ शकतील, असा संशय अधिकारी व्यक्त करीत आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची जबाबदारी शालेय शिक्षण खात्यावर आहे. सर्व विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करावी. संबंधित विद्यार्थ्यांना पुन्हा दहावी वर्गात दाखल करून घेऊन पुढील वर्षी परीक्षा दिल्यास विद्यार्थी परीक्षेत निश्चित उत्तीर्ण होतील, असे पालकांना समजावून सांगावे. दोन, तीन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा दहावीच्या वर्गात दाखल करून घेऊन अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिल्यास त्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढू शकते, असा शिक्षण खात्यातून मतप्रवाह आहे.
पालक स्थलांतराचा परिणाम
बेळगाव शैक्षणिक जिह्याच्या तुलनेत चिकोडी शैक्षणिक जिह्याच्या काही तालुक्यातील व बेळगाव शहर गटशिक्षण अधिकारी कार्यक्षेत्रातील विद्यार्थी दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. या भागातील पालक रोजगारासाठी स्थलांतर करीत असल्याने त्यांची मुले शिक्षणापासून दूर राहत आहेत. याचा परिणाम वार्षिक परीक्षेच्या निकालावर होतो आहे.










