अर्ज भरण्यासाठी उडतेय झुंबड : सरकारी कॉलेजला अधिक पसंती
प्रतिनिधी /बेळगाव
दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडत आहे. यावषी निकाल वाढल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कसरत करावी लागत आहे. खासगी कॉलेजची वाढलेली फी लक्षात घेता विद्यार्थ्यांचा ओढा सरकारी कॉलेजकडे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांसमोर विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.
19 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला. यावषी निकालात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवेशाचा पेच निर्माण झाला आहे. निकालाच्या दुसऱया दिवसापासून प्रवेश अर्ज वितरणाला सुरुवात झाली. 31 मेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा, असे कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे अर्ज भरणे, कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे.
सरकारी कॉलेजकडे विद्यार्थ्यांचा कल
सध्या शहरातील नामांकित कॉलेजमध्ये 20 हजारांपासून 50 हजारांपर्यंत अकरावी प्रवेशासाठी फी आकारली जात आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ही फी परवडणारी नसल्याने सरकारी कॉलेजकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. शहरात 5 ते 6 सरकारी पदवीपूर्व कॉलेज असून त्यामध्ये प्रवेशासाठी अत्यल्प फी असल्याने प्रवेशासाठी झुंबड उडत आहे.
बेळगावमध्ये वडगाव येथे सरकारी पदवीपूर्व कॉलेज, राणी चन्नम्मा चौक येथील सरदार्स पदवीपूर्व कॉलेज, शहापूर येथील चिंतामणराव पदवीपूर्व कॉलेज, शहापूर येथील सरस्वती गर्ल्स पदवीपूर्व कॉलेज या सरकारी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. यावषी कला व वाणिज्य शाखेपेक्षा विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसत आहे. यावषी गुणवत्ता वाढल्याने 93 टक्क्मयांवरील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेला प्रवेश मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.









