घरापासून दोनशे मिटर अंतरावरील नाणूस नदीत बुडाला : फोंडय़ात दोन महिन्यात चौघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
प्रतिनिधी /फोंडा
नाणूस-उसगांव येथे घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नाणूस नदीत बुडून एका 14 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल बुधवार सायंकाळी 5.30 वा. सुमारास उघडकीस आली. प्रथमेश चंद्रशेखर गावडे (नाणूस उसगांव) असे त्याचे नाव आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाणूस येथे घरापासून 200 मिटर अंतरावर असलेल्या नाणूस नदीत दुपारी 3 वा. सुमारास आंघोळीसाठी वाडयावरील चार मित्रासह गेला होता. आंघोळीत पोहण्याचा आनंद घेत असताना प्रथमेश खोल डोहात ओढला गेला, गटांगळया खाऊ लागला व नदीत बुडाला. स्थानिक व घरच्या मंडळीकडून आटोक्याचे प्रयत्न केलें मात्र प्रथमेशचा जीव वाचविण्यास अपयशी ठरले. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगांव येथील होस्पिसिओ इस्पितळात दाखल करण्यात आला.
मयत प्रथमेश उत्कृष्ट समेळवादक म्हणून वाडय़ावर परिचित
मयत प्रथमेश हा गांजे येथील सरकारी हायस्कूलात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. लहान वयातच त्याला समेळ वादनाची आवड होती. शिमगोत्सवात तो ताशा वाजवित असून त्यानी समेळ व ताशा वादनात अनेक पारितोषिकेही प्राप्त केलेली आहेत. वाडय़ावर गणेश चतुर्थीच्या आरत्यात त्याचे समेळवादनाची चर्चा हमखास असायची. त्याचे वडील वाळपई येथे सरकारी बांधकाम विभागात कामाला आहेत. तर आई गृहिणी आहे. त्याला एक बहीण असून ती पाचवीच्या वर्गात शिकत आहे. घरालगतच असलेल्या नदीत बुडून दुर्दैवी अंत झाल्याने नाणूस परिसरात शोककळा पसरलेली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक सुरज काणकोणकर अधिक तपास करीत आहे.
फेंडय़ात दोन महिन्यात तीन अल्पवयीनासह चार जण बुडाले
फोंडा परिसरात दोन महिन्याच्या काळात एकूण चार कोवळया मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. काही दिवसापुर्वी दाभाळ येथे विद्यार्थ्यांचा एक गटातील 21 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. त्याच्या एक महिन्यापुर्वी करमळे केरी येथे कुळागरातील पाण्य़ाच्या टाकीत बुडून दोन कोवळय़ा बालकांचा दुर्दैवी मृत्यूची घटना घडली होती. अशा घटना घडत असताना पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे असे आवाहन फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी केले आहे.









