2 जणांना अटक, विद्यार्थ्याचे रॅगिंग झाल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या जादवपूर विद्यापीठात विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना रविवारी अटक केली आहे. या विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यार्थ्याचे रॅगिंग केल्याचा आरोप आहे. तर पोलिसांनी विद्यापीठाच्या वसतीगृहात अवैध स्वरुपात वास्तव्य करणाऱ्या एका माजी विद्यार्थ्यालाही अटक केली आहे.
विद्यापीठात 9 ऑगस्ट रोजी 18 वर्षीय विद्यार्थ्याचा वसतीगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. स्वप्नदीप कुंडूच्या मृत्यूसाठी वसतीगृहातील विद्यार्थी जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. पोलिसांनी 11 ऑगस्ट रोजी एका माजी विद्यार्थ्याला अटक करत त्याची कसून चौकशी केली होती. त्याने चौकशीदरम्यान अन्य दोन विद्यार्थ्यांची नावे घेतली होती. या दोन्ही विद्यार्थ्यांना रविवारी अटक करण्यात आली आहे. दीपशेखर दत्त आणि मनोतोष घोष हे स्वप्नदीप राहत असलेल्या वसतीगृहातच राहत होते. स्वप्नदीप बाल्कनीमधून खाली पडताना हे दोघेही वसतीगृहातच होते.









