हैदराबाद / वृत्तसंस्था
मोहम्मद सैफ नावाच्या ज्येष्ठ विद्यार्थ्याकडून सातत्याने रॅगिंग केले जात असल्याने त्या असहय़ त्रासाला कंटाळून तेलंगणातील डॉ. प्रिती नामक दलित विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. ही विद्यार्थिनी वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होती. तिच्यापेक्षा ज्येष्ठ असणारा मोहम्मद सैफ हा तिच्याच महाविद्यालयातील विद्यार्थी तिचा रॅगिंगच्या माध्यमातून सातत्याने छळ करीत होता. मोहम्मद सैफ याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे.
ज्येष्ठ विद्यार्थ्याच्या त्रासाला कंटाळून तिने गेल्या शुक्रवारी रात्री विषाचे इंजेक्शन टोचून घेतले होते. त्यानंतर तिला खूप त्रास होऊ लागला होता. तिने नंतर आपल्या मार्गदर्शक डॉक्टरांकडे पोट आणि डोक्यात असहय़ वेदना होत असल्याची तक्रार केली होती. मात्र विष अंगात भिनल्याने तिचा सोमवारी मृत्यू झाला. तिचे वडील नरेंद्र यांनी मोहम्मद सैफ याच्या विरोधात तक्रार सादर केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर रॅगिंगच्या माध्यमातून छळ करणे, आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि अनुसूचित जाती, जमाती संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यापत आला आहे. महाविद्यालय आणि अभ्यासक्रमाच्या रुग्णालयावरही पोलिसांनी निष्काळजीपणा दाखविल्याचा आरोप केला आहे. प्रिती (वय 26) ही येथील ककाटिया वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती.
डॉ. प्रिती आणि मोहम्मद सैफ यांच्यात झालेल्या व्हॉटस्अप संवादांमधून तो तिच्यावर रॅगिंग करत असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. प्रिती एमजीएम रुग्णालयात इंटर्नशिप करत होती. तिथेच तिने 22 फेब्रुवारीला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. टॉक्झिकॉलॉजी अहवालाच्या आधाराने आरोपी मोहम्मद सैफ याच्यावर पुढील करवाई केली जाणार आहे.









