डॉ. आंबेडकर यांच्या शालेय जीवनाची आठवणीत साताऱ्यात प्रवेश दिन
सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या दिवशो शाळेत प्रवेश घेतला त्या दिवसाच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘विद्यार्थी प्रवेश दिन’ श्री. छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सुनिल जाधव, प्रज्ञेश वाघमारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, महिला व बालकल्याण अधिकारी नागेश ठोंबरे, गटशिक्षणाधिकारी रविंद्र खेदारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण-प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथील बनसोडे आणि अमोल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. अनिस नायकवडी यांनी प्रतापसिंह हायस्कूलचा ऐतिहासिक वारसा आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. बार्टी संस्थेचे विभाग प्रमुख वनन जोगदंड यांनी “काय शिकला तू भिमा” या कवितेद्वारे डॉ. आंबेडकर यांचे विचार मांडले.
राहुल गावडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची ओळख करून त्यांचा विकास करण्याचे आवाहन केले. प्रमुख वक्ते अमोल भोसले यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग कथित करत वाचन आणि संस्कार यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.प्रास्ताविक मुख्याध्यापक सन्मती देशमाने यांनी केले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देत शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.कार्यक्रमाच्या शेवटी समता दल अधिकारी व सर्व उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.








