स्पर्धात्मक परीक्षेसाठी मंत्री हेब्बाळकरांकडून मदत मिळणार
बेळगाव : सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेतून मिळणाऱ्या पैशातून शिक्षण घेत बारावी कला शाखेमध्ये बेळगाव जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थिनीला स्पर्धात्मक परीक्षेचे प्रशिक्षण देण्यास महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तयारी दर्शविली आहे. पृथ्वी होळी (रा. चिक्क्ढाsप्प, ता. सौंदत्ती) असे बारावीत कला शाखेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पृथ्वीने आईला गृहलक्ष्मी योजनेतून मिळणाऱ्या रकमेतून पीयूसीचा अभ्यास केला आहे. पृथ्वीने इतिहास विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळविले आहेत. भविष्यात आयपीएस अधिकारी व्हावे, अशी तिची इच्छा आहे. यासंबंधीचे वृत्त प्रसार माध्यमातून मंत्री हेब्बाळकर यांनी जाणून घेत तिला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पृथ्वीला मोफत प्रशिक्षण द्यावे, तिच्या प्रशिक्षणासाठी येणारा सर्व खर्च आपण देऊ, असे मंत्री हेब्बाळकर यांनी धारवाडच्या क्लासिक केएएस व स्टीज सर्कलला कळविले आहे. पृथ्वीला आयपीएससह युपीएससी परीक्षेचेही मोफत प्रशिक्षण द्यावे, अशी सूचना मंत्री हेब्बाळकर यांनी संबंधित संस्थेला केली आहे. पृथ्वीला मोफत प्रशिक्षण देऊ असे आश्वासन क्लासिक स्टडी सेंटरच्या प्रमुखांनी दिले आहे.
“दोन वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले. माझ्या आईला गृहलक्ष्मी योजनेतून मिळणारी रक्कम मला अभ्यासासाठी उपयोगी पडली. आता मला स्पर्धात्मक परीक्षा द्यायची असून प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री हेब्बाळकर पुढे झाल्या आहेत. मी त्यांच्याबद्दल ऋणी आहे, असे पृथ्वीने म्हटले आहे.









