पालकमंत्र्यांचे पुत्र राहुल अडकल्याने उडाला गोंधळ : तब्बल अर्ध्या तासानंतर काढण्यात आले बाहेर
बेळगाव : पालकमंत्र्यांचे सुपुत्र लिफ्टमध्ये अडकले आणि या घटनेने हॉस्पिटलचे प्रशासन व पोलीस अधिकारी धास्तावले. सोमवारी सकाळी 12 च्या दरम्यान हा प्रकार घडला. यामुळे काहीकाळ गोंधळ उडाला. जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे पुत्र राहुल जारकीहोळी बसव पंचमीच्या निमित्ताने रुग्णांना फळे वाटप करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रसूती विभागाकडे लिफ्टमधून निघाले होते. मात्र लिफ्ट मधेच अडकून पडल्याने राहुल यांच्यासह लिफ्टमधील अन्य लोकही अडकून पडले. आतील लोकांनी बाहेर आवाज देण्यास सुरुवात केल्याने प्रारंभी नेमके काय घडले, हे कोणाच्याच लक्षात आले नाही. मात्र लिफ्टमध्ये अनेक लोक अडकल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आणि एकच पळापळ सुरू झाली. मानव बंधुत्व मंच व विविध संघटनांच्या माध्यमातून नागपंचमी हा सण बसव पंचमी म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर राहुल जारकीहोळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले होते. सर्वजण लिफ्टमधून रुग्णालयातील वरच्या मजल्यावर जात असताना ओव्हरलोड झाल्याने लिफ्ट वर जाण्याऐवजी एक फूट खाली घसरली. लिफ्टचा दरवाजा उघडणे अवघड झाले. त्यामुळे सर्वजण लिफ्टमध्येच अडकून पडले. जवळपास 15 कार्यकर्ते, डॉक्टर, नर्स या लिफ्टमध्ये अडकून पडल्याने गोंधळ उडाला. यानंतर टेक्निशीयनला बोलाविण्यात आले. तब्बल अर्ध्या तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले आणि सिव्हिल प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी एसीपी नारायण बरमनी, पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिरची यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मोठी गर्दी केली होती.









