केंद्रीय जनगणना आयुक्तांचे गोवा सरकारला स्पष्टीकरण
पणजी : पुढील जनगणना पूर्ण झाल्याशिवाय गोव्यातील विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना होणार नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय जनगणना आयुक्त मृत्यूंजय कुमार नारायण यांनी गोवा सरकारला दिले आहे. मार्च 2027 पूर्वी पुनर्रचना शक्य नाही असे त्यांनी गोवा राज्य सरकारला कळवल्यामुळे 2027 च्या विधानसभा निवडणुकीत एसटी (अनुसूचित जमाती) साठी राखीव मतदारसंघ मिळणार नसल्याचे उघड झाले आहे. नारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत गोवा राज्यात जनगणना होणार आहे. ती पूर्ण झाली की मग पुनर्रचना आयोगाची स्थापना केली जाणार आहे. मगच मतदारसंघ पुनर्रचना करण्यात येणार आहे. गोव्यातील विधानसभा निवडणूक मार्च -एप्रिल 2027 मध्ये होणार असल्याने तत्पूर्वी एसटीसाठी विधानसभा मतदारसंघ आरक्षित करता येणार नाहीत. शिवाय 31 डिसेंबर 2025 पर्यंत मतदारसंघ पुनर्रचना गोठवण्यात आल्यामुळे ताज्या जनगणनेचा तपशील मार्च 2027 नंतरच उघड होणार आहे. त्यावर आधारित एसटीसाठी मतदारसंघ आरक्षित होणार असून 2032 मधील निवडणुकीत ते शक्य होईल, असे एकंदरीत दिसून येत आहे.









