बसेसची कमतरता : मागील दीड वर्षापासून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास कायम सुरू
बेळगाव : बेळगाव विभागात बसेसचा तुटवडा असल्याने पासधारक विद्यार्थ्यांना दररोज बससाठी संघर्ष करावा लागत आहे. दरवाजात लोंबकळत जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. बस फेऱ्या वाढवून प्रवास सुरक्षित करावा, अशी मापक अपेक्षा आता विद्यार्थी वर्गातून व्यक्त होत आहे. काँग्रेस सरकारने मागील जून 2023 पासून राज्यात शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवास सुरू केला आहे. तेव्हापासून बससेवेचे तीनतेरा वाजले आहेत. महिला प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने विविध मार्गावर बसेसची कमतरता जाणवू लागली आहे. शिवाय अनियमित आणि अपुऱ्या बससेवेची समस्येतही वाढ झाली आहे. दरम्यान शहरातील विविध बसस्थानकावर विद्यार्थी बसमध्ये चढण्यासाठी शर्यतीप्रमाणे धावू लागल्याचे दिसत आहे. या चढाओढीत मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. मागील वर्ष दीड वर्षापासून विद्यार्थ्यांचा हा जीवघेणा प्रवास कायम सुरु आहे.
प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याने समस्या
बेळगाव विभागात 650 हून अधिक बसेस सेवा देतात. यापैकी काही बसेस लांब पल्ल्यासाठी धावतात. तर काही शहरांतर्गत तर काही ग्रामीण भागातही धावतात. मात्र प्रवाशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाल्याने सर्वत्र बसेसचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी प्रवाशांना धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत आहे.
सकाळ-सायंकाळ बसमध्ये चढणे अशक्य
सकाळी आणि सायंकाळी शाळेच्या वेळेत बसेसमध्ये गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे चेंगराचेंगरी करतच प्रवास करावा लागत आहे. तर काही बसस्थानकावर बसेस फूल होऊन धावत असल्याने न थांबताच पुढे जात असल्याचे प्रकार पहावयास मिळत आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यार्थी जीव धोक्यात घालून दरवाजात लोंबळकत प्रवास करत असल्याचेही दिसत आहेत. त्यामुळे हा धोकादायक प्रवास थांबणार तरी कधी? असा प्रश्नही पालक आणि विद्यार्थ्यांना पडू लागला आहे.









