बेळगाव : दहावीचा निकाल लागताच विद्यार्थ्यांनी शनिवारी पदवीपूर्व कॉलेजमध्ये प्रवेशासाठी गर्दी केली होती. कॉलेजमधून प्रवेशाची माहिती मिळविण्यासोबतच अर्ज भरण्याची प्रक्रिया केव्हापासून सुरू होईल हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी कॉलेजमध्ये गर्दी केली होती. सोमवारी यामध्ये अधिक भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शुक्रवारी दुपारी परीक्षा मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला. यावर्षी निकालामध्ये वाढ झाल्याने प्रवेश मिळविताना चढाओढ होणार आहे. हे पाहून आतापासूनच प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. शनिवारी बेळगावमधील महत्त्वाच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या रांगा लागल्या होत्या. कॉलेजचे प्रॉस्पेट घेण्यासोबतच प्रवेशाबाबतची माहिती घेतली जात होती.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ
यावर्षी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली आहे. 90 टक्क्यांहून अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. शहरातील तीन ते चार कॉलेजमध्ये प्रवेश अर्ज भरण्यात आला असून, ज्या कॉलेजमध्ये जागा उपलब्ध असेल तेथे प्रवेश घेण्याची तयारी विद्यार्थ्यांनी केली आहे.
प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना करावी लागणार रस्सीखेच
बेळगाव शहरात 8439 विद्यार्थी यावर्षी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. तर बेळगाव ग्रामीणमधील 5247 विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. ग्रामीण भागातील बरेचसे विद्यार्थी शहरात प्रवेश घेत असल्याने प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्सीखेच करावी लागणार आहे. त्यामुळे आधीपासूनच प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची व पालकांची तयारी सुरू आहे.









