शॅकमालक आज पर्यटन संचालकांना भेटणार
मडगाव : अनुभवी शॅकमालकांना संपवण्याचा छुपा अजेंडा असल्याचा पर्यटन संचालकांवर आरोप करत शॅकमालकांनी शुक्रवारी सरकारने जाहीर केलेल्या शॅक धोरणातील वयोमर्यादा कलमाला विरोध केला आहे. शॅकमालकांसाठी 18 ते 60 वयोगट बंधनकारक बनविणारे कलम काढून टाकेपर्यंत शॅक धोरणाला तीव्र विरोध करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शॅकमालकांचे शिष्टमंडळ आज सोमवारी पर्यटन संचालकांची भेट घेणार असून या बैठकीनंतर पुढील कार्यवाही ठरवली जाणार आहे. या प्रश्नी पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीही भेट घेण्याचा त्यांचा मानस आहे.. वयोमर्यादा 18 ते 60 अशी ठेवून शॅक व्यवसायात सरकार नवीन लोकांना आणू इच्छित आहे, असा दावा शॅकमालक संस्थेच्या क्रूझ कार्दोज यांनी केला आहे. बहुतेक अनुभवी शॅकमालक वर्षांनुवर्षे शॅक चालवत आले आहेत आणि त्यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केलेली असावीत. व्यवसायासाठी वयाचे बंधन लागू करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे ते म्हणाले.
जर आज सरकारने शॅकमालकांवर वयाचे बंधन घातले, तर उद्या याबाबतीत पर्यटन विभागाच्या अजेंड्यावर पारंपरिक जलक्रीडाचालक आणि टुरिस्ट टॅक्सीचालकही येतील, असे क्रूझ म्हणाले. सरकारने अनुभवी शॅकमालकांना आश्वस्थ करताना सांगितले आहे की, हे धोरण त्यांच्या फायद्यासाठी आहे. मात्र खरे तर हे धोरण अनुभवी शॅकमालकांच्या विरोधात आहे आणि शॅक व्यवसायात नव्याने येणाऱ्यांना मार्ग मोकळा करण्यासाठी आहे. त्यामुळे या धोरणाला कडाडून विरोध केला जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.









