इंग्लंड-न्यूझीलंड दुसरी कसोटी, इंग्लंड प. डाव 3 बाद 315
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
हॅरी बुक आणि जो रुट यांच्या दमदार नाबाद शतकांच्या जोरावर शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीतील खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडने पहिल्या डावात 3 बाद 315 धावा जमविल्या. रुट 101 तर हॅरी बुक 184 धावांवर खेळत आहेत. या जोडीने चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 294 धावांची भागीदारी केली आहे.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत इंग्लंडने यापूर्वी पहिली कसोटी जिंकून यजमान न्यूझीलंडवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. या दुसऱया कसोटीत न्यूझीलंडचा कर्णधार टिम साऊदीने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. बेसिन रिझर्व्हच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज अधिक प्रभावी ठरतील या हेतूने साऊदीने हा निर्णय घेतला होता आणि सुरुवातीच्या सात षटकांमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी तो सार्थ ठरविला होता.

क्रॉले आणि डकेट या सलामीच्या जोडीला न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी स्वींग गोलंदाजीवर चांगलेच हैराण केले. डावातील चौथ्या षटकातच मॅट हेन्रीने क्रॉलेला केवळ 2 धावांवर ब्लंडेलकरवी झेलबाद केले. हेन्रीने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना ओली पॉपला ब्रेसवेलकरवी झेलबाद केले. पॉपने 6 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. टिम साऊदीच्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात डकैट ब्रेसवेलकडे झेल देऊन तंबूत परतला. त्याने 21 चेंडूत 9 धावा जमविल्या. इंग्लंडची स्थिती यावेळी 3 बाद 21 अशी केविलवाणी झाली होती.
जो रुट आणि हॅरी बुक यांनी इंग्लंडचा डाव बऱयापैकी सावरला. उपाहारावेळी इंग्लंडची स्थिती 3 बाद 101 अशी होती. इंग्लंडचा माजी कर्णधार रुटला 31 धावांवर असताना न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांनी पायचीतविरुद्ध जोरदार अपील केले. पण पंचांनी हे अपील फेटाळले. रुट आणि बुक या जोडीने उपाहारानंतरच्या दुसऱया सत्रात 136 धावा जमविल्या. चहापानावेळी इंग्लंडची स्थिती 3 बाद 237 अशी समाधानकारक होती. कर्णधार साऊदीने इंग्लंडची ही जमलेली जोडी फोडण्यासाठी गोलंदाजीत वारंवार बदल केला. पण त्याला दिवसअखेरपर्यंत यश आले नाही. 24 वषीय बुकने मिचेलच्या सलग दोन चेंडूंवर दोन उत्तुंग षटकार ठोकले. त्यानंतर त्याने ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर चौकार ठोकून आपले शतक पूर्ण केले. रुटच्या तुलनेत बुक अधिक आक्रमक फलंदाजी करत होता. या दुसऱया सत्रामध्ये रुटने एकेरी धाव घेत आपले कसोटीतील 57 वे अर्धशतक झळकविले. हॅरि बुकने 169 चेंडूत 5 षटकार आणि 24 चौकारांसह नाबाद 184 तर रुटने 182 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 101 धावा जमविल्या. हॅरि बुकने इंग्लंडकडून खेळताना गेल्या पाच कसोटीत आतापर्यंत 4 शतके झळकविली आहेत. रुटने खेळाच्या पहिल्या दिवसातील शेवटच्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. न्यूझीलंड संघाने पहिल्या अर्ध्या तासाच्या खेळामध्ये आपले तीनपैकी दोन रिव्हय़ू वाया घालविले. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्रीने 64 धावात 2 तर टिम साऊदीने 48 धावात 1 गडी बाद केला. शुक्रवारी खेळाच्या पहिल्या दिवशी शेवटच्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर अचानक वादळी पावसाला सुरुवात झाल्याने पंचांनी खेळ थांबविला. दिवसभराच्या खेळात केवळ 65 षटके टाकण्यात आली. इंग्लंडने न्यूझीलंडच्या भूमीवर 2008 नंतर अद्याप कसोटी मालिका जिंकलेली नाही. आता त्यांनी या मालिकेतील पहिली कसोटी जिंकून आघाडी मिळविली आहे. इंग्लंडचा संघ न्यूझीलंडमध्ये यजमान संघाचा पराभव करण्यासाठी आतुरलेला आहे. या दुसऱया कसोटीसाठी इंग्लंड संघामध्ये कोणताच बदल करण्यात आला नाही. पहिल्या कसोटीतील संघ कायम ठेवण्यात आला तर न्यूझीलंड संघाने या दुसऱया कसोटीसाठी टिकनेर आणि स्कॉट कुग्लेजीन यांना वगळले आणि हेन्री आणि यंग यांना संघात स्थान दिले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव 65 षटकात 3 बाद 315 (क्रॉले 2, डकेट 9, पॉप 10, रुट खेळत आहे 101, ब्रुक खेळत आहे 184, हेन्री 2-64, साऊदी 1-48).









