रविवारपासून नक्षत्रात बदल : पश्चिम भागात अधिक पाऊस
वार्ताहर/किणये
आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने तालुक्यात जोरदार सलामी दिली आहे. रविवारपासून या नक्षत्राला सुरुवात झाली आहे. दोन दिवस पावसाचा जोर वाढला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात अधिक पाऊस होत आहे. यामुळे शिवारात पाणी साचले आहे. तसेच नदी नाले प्रवाहीत झाले आहेत. यामुळे कामे ठप्प झाली आहेत. शेतकऱ्यांनी भातपेरणी केलेली आहे. बहुतांशी ठिकाणी भात उगवले आहे. मात्र, यामध्ये पाणी साचल्यामुळे कोळपणीची कामे ठप्प झाली आहेत. आठ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्राच्या प्रारंभी पाऊस आला नाही.
त्यामुळे मृगनक्षत्र कोरडे जाणार की काय असे साऱ्यांनाच वाटत होते. मात्र, मृग नक्षत्रांनी बऱ्यापैकी साथ दिली व पावसाला सुरुवात झाली. यंदा मान्सूनपूर्व पाऊस मुसळधार झाला. पावसामुळे विविध ठिकाणी विद्युत खांब कोसळले. झाडे व झाडांच्या फांद्या पडल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर पाऊस आला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाला चिंता लागून राहिली होती. मात्र, अवघ्या दोन-चार दिवसातच मृग नक्षत्राच्या पावसाला जोरदार प्रारंभ झाला आणि बळीराजा सुखावला. तालुक्यात रविवारी पावसाच्या सरी बरसल्या तर पश्चिम भागात सायंकाळी मोठा पाऊस झाला. सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.
पश्चिम भागातील भात पिकाचे नुकसान
पश्चिम भागात अधिक पाऊस झाल्यामुळे शिवारत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या भातात पाणी साचल्याने भात पिकाचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी दोन वेळा पेरणी केली आहे. शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचून कोवळी भात पिके पाण्याखाली गेली आहेत. कर्ले, किणये, बहाद्दरवाडी, रणकुंडये, बामणवाडी, जानेवाडी, बिजगर्णी, बेळगुंदी, बेळवट्टी, सोनोली, यळेबैल, राकसकोप, इनाम बडस, बाकनुर भागातील शेतकऱ्यांनी तर दोन वेळा भातपेरणी केली. जमिनीतून भात पीक बाहेर येण्याच्या कालावधीतच इतका मोठा पाऊस झाल्यामुळे या भागातील शेतकरी हतबल झाला आहे









