क्रेटासह स्विफ्टलाही सकारात्मक प्रतिसाद : एकूणच भारतीय कार बाजार तेजीत
नवी दिल्ली
एकंदर पाहता मे 2023 मध्ये कारची विक्री प्रचंड वाढली आहे. यावेळी आपण मे महिन्यात विकल्या गेलेल्या पहिल्या 10 कारबद्दल जाणून घेणार आहोत. (टॉप 10 कार्स मे 2023). या यादीमध्ये सर्वात पहिल्या नंबरवर मारुती सुझुकी राहिली आहे. मारुती सुझुकीचे बलेनो मॉडेल पहिल्या स्थानावर आहे.
मे 2023 च्या उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, कंपनीने एकूण 18733 युनिट्सची विक्री केली आहे. तर मे 2022 मध्ये कंपनीने एकूण 13970 युनिट्सची विक्री केली होती. वर्षाच्या आधारावर पाहता एकूण वाढ 34 टक्क्यांहून अधिक आहे.

स्विफ्ट दुसऱ्या क्रमांकावर
स्विफ्ट दुसऱ्या स्थानावर आहे. मे 2023 च्या आकडेवारीनुसार, कंपनीने स्विफ्टच्या एकूण 17346 युनिट्सची विक्री केली आहे. मे 2022 मध्ये, हा डाटा एकूण 14133 युनिट्स होता. वर्षभरात 22 टक्के वाढ दिसून आली आहे. वॅगनार मॉडेलची उत्तम विक्री झाली असून क्रमवारीत हे मॉडेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. मे 2023 मध्ये एकूण 16258 युनिट्सची विक्री झाली आहे आणि मे 2022 मध्ये एकूण 14814 युनिट्सची विक्री झाली होती. पण वर्षाच्या आधारावर पाहता एकूण वाढ 3 टक्क्यांनी कमी झाली आहे.
क्रेटा मॉडेलची मागणी कायम
चौथ्या क्रमांकावर क्रेटा मॉडेल आहे. मे 2023 मध्ये एकूण 14449 युनिट्सची विक्री झाली. मे 2022 मध्ये कंपनीने एकूण 10973 युनिट्सची विक्री केली. अशा प्रकारे मे महिन्यात पाहायला गेल्यास सर्वाधिक विक्री होणारी ही चौथी कार ठरली आहे.
पाचव्या क्रमांकावर टाटाची नेक्सॉन
मे 2023 मध्ये टाटाच्या नेक्सॉनची एकूण 14423 युनिट्सची विक्री झाली आणि मे 2022 मध्ये कंपनीने एकूण 14614 युनिट्सची विक्री केली होती.
सहाव्या क्रमांकावर सर्वाधिक विक्री होणारी कार ब्रेझा आहे. मे 2023 मध्ये एकूण 13398 युनिट्सची विक्री झाली. मे 2022 मध्ये हा आकडा 10312 युनिट्स इतका होता.
इको मॉडेलला मोठी मागणी
मे 2023 मध्ये, इको मॉडेलची प्रचंड विक्री झाली आहे. मे 2023 मध्ये, त्याची एकूण 12818 युनिट्सची विक्री दिसून आली. मे 2022 मध्ये एकूण 10312 युनिट्सची विक्री झाली. विक्रीच्या बाबतीत इको सातव्या स्थानावर आहे.
प्रवासी वाहनांच्या विक्रीत 13.54 टक्के वाढ
मे महिन्यात 3.34 लाख कारची घाऊक विक्री झाल्याची माहिती सियामच्या अहवालात देण्यात आली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) मंगळवारी (13 जून) मे-2023 मध्ये प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीची आकडेवारी जाहीर केली. अहवालानुसार, 13.54 टक्के वाढीसह देशभरात 3,34,247 कार्सची घाऊक विक्री झाली, तर कार निर्मात्यांनी मे-2022 मध्ये डिलर्सना 2,94,392 कार्सचा पुरवठा केल्याचे सांगण्यात येत आहे. दुचाकींची देशांतर्गत घाऊक विक्री 17.42 टक्के वाढीसह 14,71,550 युनिट्स झाली. गेल्या वर्षी मे महिन्यात 12,53,187 युनिट्सची विक्री झाली होती. त्याचप्रमाणे तीनचाकी वाहनांची घाऊक विक्री देखील मे-2022 मधील 28,595 युनिट्सवरून 70.4 टक्क्यांनी वाढून या वर्षी मे मध्ये 48,732 युनिटवर पोहचली आहे. सियाम म्हणाले, ‘मे-2022 मध्ये 15,32,861 युनिट्सच्या तुलनेत विविध श्रेणींमध्ये एकूण 18,08,686 वाहनांची विक्री झाली आहे.









