रताळी वेलींना मिळालेय जीवदान : भातरोप लागवडीसाठी चिखल करण्याच्या कामाला वेग
वार्ताहर /उचगाव
बेळगाव तालुक्यामध्ये ‘तरणा’ पावसाच्या दमदार हजेरीने माळ जमिनीतील खरीप हंगामातील पिकांना आता जोर आला आहे. दमदार पावसाच्या जोरावरच शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीमध्ये पूर्णपणे गुंतल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून दिसून येत आहे. ‘पुनर्वसू’ नक्षत्रावर पावसाच्या दमदार प्रारंभाने माळ जमिनीतील खोळंबलेली भुईमूग, रताळी, बटाटे, मिरची, नाचणा, कुळीथ, जोंधळा, बाजरी व भाजीपाला यासारखी पिकांची लागवड खोळंबून होती. पाऊसच नसल्याने सदर पिकांच्या बियाणांची लागवड केली आणि पावसाने ओढ दिली तर मोठ्याप्रमाणात या पिकांचे नुकसान होऊन दुबार पेरणीचे संकट ओढवेल या भीतीने शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत राहिले. परंतू आता दोन दिवसांपासून दमदार पावसाला प्रारंभ झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी जोमाने खरीप हंगामाच्या लागवडीत गुंतला आहे.









