विदेशी कामगिरीचा देशातील बाजाराला फायदा
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजाराने घसरणीला विराम दिला आहे. बीएसई सेन्सेक्सने 616 अंकांची मजबूत स्थिती प्राप्त केली असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीत विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी निव्वळ लिलाव केला असून युरोपीयन बाजाराचा सकारात्मक लाभ भारतीय बाजाराला झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 616.62 अंकांनी म्हणजे 1.16 टक्क्यांनी मजबूत होत निर्देशांक 53,750.97 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 178.95 अंकांनी वधारत 1.13 टक्क्यांसह 15,989.80 वर निर्देशांक बंद झाला. बुधवारी ट्रेंडिंगदरम्यान 684.96 अंकांनी काहीवेळ उच्चांकी स्थिती प्राप्त केल्याचे दिसून आले.
सेन्सेक्समधील मुख्य कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेन्ट्स, टायटन, मारुती सुझुकी इंडिया, कोटक महिंद्रा बँक आणि नेस्ले यांचे समभाग लाभात राहिले आहेत. दुसऱया बाजूला पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन ऍण्ड टुब्रो तसेच टाटा स्टील यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
राष्ट्रीय शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) पाच जुलै रोजी 1,295.84 कोटी रुपयाच्या मूल्याच्या समभागाची खरेदी केली आहे.
जागतिक बाजारातील स्थिती
जगातील विविध बाजारांमध्ये आशियातील अन्य बाजारात जपानचा निक्की, चीनचा शांघाय, हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी नुकसानीत राहिला आहे. तर युरोपमधील मुख्य बाजारात सुरुतवातीला तेजीचा कल राहिला होता. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 2.43 टक्क्यांनी वधारुन 105.3 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.









