ठेकेदाराला धरले धारेवर : रस्त्यासाठी शिवारात टाकलेली माती काढण्यास पाडले भाग
► प्रतिनिधी / बेळगाव
शेतकऱ्यांचा विरोध पायदळी तुडवत हलगा–मच्छे बायपासचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची नोटीस न देता बायपाससाठी माधवपूर शिवारात माती टाकण्यात आल्याने जुने बेळगाव येथील शेतकऱ्यांनी शनिवार दि. 8 रोजी तीव्र विरोध केला. इतकेच नव्हे तर भरावासाठी शिवारात टाकण्यात आलेली माती काढण्यास संतप्त शेतकऱ्यांनी ठेकेदाराला भाग पाडले.
सुपीक जमिनीतून हलगा–मच्छे बायपास रोड केला जात असल्याने त्याला शेतकऱ्यांतून सुऊवातीपासून तीव्र विरोध सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून शेतकरी बायपास विरोधात लढा देत आहेत. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध पायदळी तुडवत रस्त्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. शेतकरी सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे बायपासला विरोध करत आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि ठेकेदाराकडून पोलीस बळाचा वापर करत बायपासचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. बायपासच्या पट्ट्यात सुपीक जमीन असून त्या ठिकाणी तिबार पेरणी केली जाते. अल्पभूधारक भूमिहीन होत असल्याने बायपासचे काम रद्द करण्यात यावे, यासाठी शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाई बरोबरच न्यायालयात देखील दावा दाखल करण्यात आला आहे. या दाव्याची सुनावणी 15 फेब्रुवारीला होणार आहे. कायदेशीररित्या भूसंपादन करण्याआधीच तसेच जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याआधीच बायपासचे काम रेटले जात आहे. सध्या मातीचा भराव टाकून बायपासचे काम केले जात आहे. पण बहुतांश शेतकऱ्यांना भरपाई आणि नोटीस देण्यात आलेली नाही. त्याचप्रकारे माधवपूर शिवारात बायपाससाठी माती टाकली जात होती. ही माहिती समजताच जुने बेळगाव येथील संतप्त शेतकरी शांताराम होसुरकर, मल्लाप्पा बजंत्री, संजू बजंत्री, गणपती बजंत्री यांनी माधवपूर शिवारात धाव घेतली. ठेकेदाराने शिवारात टाकलेली माती काढण्यास सांगण्यात आले. शेतकऱ्यांचा ऊद्रावतावर पाहून ठेकेदाराने टाकलेली माती जेसीबीच्या साहाय्याने हटविली. एकंदर बायपासला शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्याने दिसून येत आहे.









