कपडय़ांसह गृहोपयोगी वस्तूंना मागणी ः खाद्य व किराणा वस्तूंचा खप दमदार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सप्टेंबर 2019 च्या तुलनेमध्ये यंदाच्या सप्टेंबरमध्ये रिटेल व्यवसायाने 21 टक्क्मयांची वाढ दर्शविली आहे. यासंदर्भातील माहिती रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी नुकतीच दिली आहे. सप्टेंबर कालावधीमध्ये उत्सवी हंगाम असल्याने खरेदीत मोठी तेजी दिसून आली. या महिन्यात ग्राहकांनी नव्या कपडय़ांच्या खरेदीवर भर दिलेला होता. त्याचप्रमाणे भेटवस्तू साहित्याच्या खरेदीतही दमदार वाढ दिसली आहे.

विविध वस्तूंची मागणी वाढली
दुसरीकडे सप्टेंबर 2022 मध्ये खाद्य आणि किराणा साहित्याच्या विक्रीमध्येही लक्षणीय वृद्धी दिसली आहे. यासोबतच क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट, खेळाचे साहित्य, गृहोपयोगी टिकावू वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांचा भर अधिक दिसला. खाद्य आणि किराणा विपेत्यांनी मागच्या महिन्यामध्ये 56 टक्के अधिक व्यवसाय साध्य केला. ऍपरल व कपडय़ांची विक्री 25 टक्क्मयांनी वाढली. गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाची विक्रीही 30 टक्के वाढलेली पाहायला मिळाली.
गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे अनेक व्यावसायिकांना आपले व्यवसाय करता आले नव्हते. दोन वर्षे या व्यापाऱयांना आर्थिक ताणाचे गेले आहे. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसले आहे. यातूनच ग्राहक यंदा न चुकता खरेदीची संधी साधताना दिसत आहेत. उत्सवी काळातील सुटीच्या कालावधीमध्ये ग्राहकांनी प्रवास करण्यावर भर दिला आहे. त्याचवेळी त्यांना शॉपिंगचा मोहही होत असून त्यातून खरेदी होत आहे. यातूनच विक्रीचा आलेख उंचावत आहे. प्रियजनांसाठी भेटवस्तू खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.









