बोलीपूर्व बैठकीस परराज्यातील 20 कंपन्यांचा सहभाग : पुढील महिन्यात तीन ब्लॉकसाठी होणार ई-लिलाव
पणजी : तीन मिनरल ब्लॉक्ससाठी पुढील महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या ई-लिलावास अनुसरून नुकत्याच झालेल्या बोलीपूर्व बैठकीत खाण कंपन्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. यात गोव्याबाहेरील तब्बल 20 कंपन्यांचा सहभाग पाहता अन्य राज्यांमधील कंपन्या गोव्यात खाण व्यवसायात उतरण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बोलीपूर्व बैठकीत सध्या 24 कंपन्या सहभागी झालेल्या असल्या तरी पुढील महिन्यात होणाऱ्या लिलावात आणखीही कंपन्या सहभागी होतील, अशी अपेक्षा खाण संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
या बैठकीदरम्यान उपस्थित खाण कंपन्यांच्या प्रतिनिधींनी खात्यातील अधिकाऱ्यांकडे खाण ब्लॉकशी संबंधित विविध शंका, समस्या उपस्थित केल्या. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य माहिती स्पष्टीकरणाद्वारे त्यांचे निरसन केले. यापूर्वी जानेवारी 2023 मध्ये पाच खनिज ब्लॉक्सचा लिलाव करण्यात आला होता. आता येत्या नोव्हेंबरमध्ये आणखी तीन खाणी सुरू करण्याची योजना आहे. सरकारने 1.9 दशलक्ष टन खनिजाचा लिलाव करण्यासाठी सप्टेंबरची अंतिम मुदत निश्चित केली आहे. हे खनिज 2012 पूर्वी काढण्यात आले होते. सध्या ते विविध जेटी आणि खाण परिसरात पडून आहे.
आतापर्यंत तीन खनिज ब्लॉकचे यशस्वी लिलाव करण्यात आले आहेत. मात्र केवळ एकाच कंपनीला काम सुरू करता आले आहे. सरकारने खाण खात्याला नवीन खनिज ब्लॉक्स आणि निम्न श्रेणी खनिज डंप्सचा लिलाव प्रक्रिया जलद करण्यास सांगितले आहे. त्याशिवाय राज्यात विविध ठिकाणी असलेल्या लोह खनिजाचा ई-लिलाव करण्यास सांगितले आहे. निम्न श्रेणी खनिज डंप्सचा लिलाव ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या लिलावात उत्तर गोव्यातील होंडा येथील एक ब्लॉक आणि दक्षिण गोव्यातील कोडली-धारबांदोडा आणि कुर्पे-सुळकर्णे येथील दोन ब्लॉकचा समावेश आहे. दि. 12, 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी एमएसटीसी पोर्टलवरून त्यांचे ई-लिलाव होणार आहेत.
होंडा खनिज ब्लॉक एकूण 61 हेक्टर क्षेत्रात पसरलेला असून त्यात 5.6 दशलक्ष मेट्रिक टन खनिज आणि 0.5 दशलक्ष मेट्रिक टन डंप साठा आहे. यापूर्वी ही खाण चौगुले कंपनीकडे होती. सांगे आणि केपे तालुक्यात पसरलेल्या कुर्पे आणि सुळकर्णे खनिज ब्लॉकमध्ये एकूण 9.8 दशलक्ष मेट्रिक टन खनिज आणि 0.1 दशलक्ष मेट्रिक टन डंप आहेत. ही खाण पूर्वी धेंपो कंपनीकडे व त्यानंतर सेसा रिसोर्सेसकडे होती. कोडली खनिज ब्लॉक एकूण 377 हेक्टर क्षेत्रात पसरलेला असून त्यात 2.7 दशलक्ष टन खनिज आणि 48.5 दशलक्ष टन डंप आहे. हा ब्लॉक पूर्वी सोसिएदाद तिंबलो कंपनीकडे व नंतर वेदांता कंपनीकडे होता. दरम्यान, यशस्वी बोलीदारांना प्रत्यक्ष खाणकाम सुरू करण्यापूर्वी अनेक मंजुरी मिळवाव्या लागणार आहेत. त्यात वन, वन्यजीव, पर्यावरण आणि भूजल यांच्याशी संबंधित मंजुरी, स्फोटके वापरण्यासाठी परवाने, खाणी सुरू करण्यासाठी परवानगी, संबंधित गावातील ग्रामसभांची मान्यता, यांचा प्रामुख्याने समावेश आहे.









