3 हजार खेळाडूंवर मासिक 50,000 रुपये खर्च
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘ऑलिम्पिक-2036’ मध्ये लक्षणीय यश मिळविण्यासाठी भारताकडून जोरदार प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाने या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सक्षम असणाऱ्या 3 हजार क्रीडापटूंची निवड केली आहे. त्यांच्यावर प्रत्येक महिन्याला प्रत्येकी 50 हजार रुपयांचा खर्च करुन त्यांच्याकडून कसून सराव करुन घेतला जात आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. 21 व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन दल क्रीडा स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारतीय संघासमोर एका कार्यक्रमात ते भाषण करीत होते.
कोणत्याही क्षेत्रात यश किंवा अपयश येणे हा नैसर्गिक चक्राचाच भाग असतो. तथापि, प्रत्येकाने नेहमी विजयाचीच कामना केली पाहिजे, तसेच सातत्याने विजयी होण्याची सवय लावून घेतली पाहिजे. विजय हा आपल्यापैकी सर्वांचा ‘स्वभावधर्म’ बनला पाहिजे. जे खेळाडू विजय मिळविण्याची सवय लावून घेतात, ते नेहमीच प्रत्येक स्पर्धेत स्पृहणीय कामगिरी करुन दाखवितात. भारतात क्रीडा प्रतिभा मोठ्या प्रमाणात आहे. तिचे संवर्धन योग्य प्रकारे होण्याची आवश्यकता आहे. भारतातील क्रीडा प्रतिभेचा शोध घेण्यासाठी प्रत्येक खेड्यात क्रीडा संस्कृती रुजविण्याची केंद्रातील सरकारची योजना आहे. देशभरातून विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्याची क्षमता असणाऱ्या आणि विविध वयोगटातील खेळाडूंची निवड करणे, त्यांना सर्वोत्तम प्रशिक्षण देणे ही कामे आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने करीत आहोत, अशी माहिती देत त्यांनी केंद्र सरकारचे धोरण सविस्तररित्या स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या पुढाकाराने गेल्या 10 वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्राला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आलेले आहे. क्रीडा क्षेत्रासाठीच्या अर्थसंकल्पीय निधीत या दहा वर्षांमध्ये पाचपट वाढ करण्यात आली आहे. देशाच्या क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार शक्य तितके सर्व प्रयत्न अत्यंत काटेकोरपणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या आधारावर केले जात आहेत. केंद्र सरकारच्या विविध क्रीडा योजनांचा आणि सचेत धोरणाचा परिणाम दिसू लागला असून भारताची क्रीडा क्षेत्रात असामान्य प्रगती होईल, अशा प्रकारचे पायाभूत काम आम्ही करत आहोत, असेही प्रतिपादन अमित शाह यांनी केले.









