केंद्रबिंदू पाकिस्तानात : 5.8 रिश्टर स्केल तीव्रता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली-एनसीआर, राजस्थानच्या श्री गंगानगरसह उत्तर भारतातील अनेक भागात बुधवारी दुपारी 12.58 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानात होता. भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. त्याचे केंद्र 33 किलोमीटर खोलीवर होते. इस्लामाबाद आणि लाहोरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, या भूकंपात कोठेही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसच्या नोंदीनुसार, पाकिस्तानमध्ये 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. याच भूकंपाची झळ दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये दोन आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये पृथ्वी हादरली होती. सोशल मीडियावर काही व्हिडिओ समोर आले होते, ज्यामध्ये काही सेकंदांपर्यंत चाललेल्या भूकंपाच्या वेळी पंखे, खुर्च्या आणि इतर गोष्टी हलल्याचे दिसून येत होते. 29 ऑगस्ट रोजी इस्लामाबाद आणि रावळपिंडी येथेही भूकंपाचे धक्के जाणवले होते. जूनमध्येही पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर इस्लामाबाद आणि रावळपिंडीत पृथ्वी हादरली. याआधी जूनच्या सुऊवातीला कराचीमध्ये 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.









