न्यूझीलंड प. डाव 4 बाद 580, लंका प. डाव 2 बाद 26
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी माजी कर्णधार केन विलियम्सन आणि हेन्री निकोल्स यांच्या शानदार नाबाद द्विशतकांच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने आपला पहिला 4 बाद 580 धावांवर घोषित केला. त्यानंतर दिवसअखेर लंकेने पहिल्या डावात 2 बाद 26 धावा जमवल्या. विलियम्सनने 215 तर निकोल्सने नाबाद 200 धावा झळकवताना तिसऱ्या गड्यासाठी 363 धावांची विक्रमी भागीदारी केली.
या मालिकेत न्यूझीलंडने पहिला सामना जिंकून लंकेवर आघाडी घेतली आहे. या दुसऱ्या सामन्यात शुक्रवारी खेळाच्या पहिल्या दिवशी पाऊस, वादळी वातावरण आणि अंधूक प्रकाशामुळे केवळ 48 षटकांचा खेळ झाला पण शनिवारी सूर्यप्रकाश लख्ख असल्याने खेळात अडथळा आला नाही.
न्यूझीलंडने 2 बाद 155 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली. विलियम्सन आणि निकोल्स यांनी जवळपास संपूर्ण दिवसभर खेळपट्टीवर राहून धावांचा पाऊस पाडला. या मालिकेतील पहिल्या कसोटीत विलियम्सनने नाबाद शतक (121) धावा जमवत न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूवर दोन गड्यांनी थरारक विजय मिळवून दिला होता. तसेच त्याने गेल्या महिन्यात इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात 132 धावांचे योगदान देत आपल्या संघाला केवळ एका धावेने थरारक विजय मिळवून दिला होता.
निकोल्सला गेल्या दहा कसोटी सामन्यात अर्धशतक पार करता आले नव्हते. या मालिकेतील पहिल्या कसोटीतील त्याने पहिल्या डावात 2 तर दुसऱ्या डावात 20 धावा जमवल्या होत्या. विलियम्सनने 26 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्याने आपले पहिले अर्धशतक 106 चेंडूत पूर्ण केले. त्यानंतर निकोल्सने आपले अर्धशतक 79 चेंडूत साजरे केले. विलियम्सनने 91 धावा जमवल्या असताना त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपला 8000 धावांचा टप्पा ओलांडला. विलियम्सनने आपले 28 वे कसोटी शतक 231 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकाराच्या मदतीने झळकवले. त्यानंतर निकोल्सने आपले शतक 5 तास खेळपट्टीवर राहून 8 चौकाराच्या मदतीने 173 चेंडूत पूर्ण केले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी द्विशतकी भागीदारी 308 चेंडूत पूर्ण केली. उपाहारापूर्वीच लंकेने दुसरा नवा चेंडू घेतला. उपाहाराला खेळ थांबला. त्यावेळी न्यूझीलंडने 82 षटकात 2 बाद 304 धावा जमवल्या होत्या. उपाहारानंतर विलियम्सन आणि निकोल्स यांनी द्विशतकी भागीदारी नोंदवली.

खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर विलियम्सनने आपले दीडशतक 231 चेंडूत 17 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नोंदवले. चहापानावेळी न्यूझीलंडची स्थिती 108 षटकात 2 बाद 443 अशी होती. निकोल्सने या सत्रामध्ये आपले शतक पूर्ण केले. तसेच न्यूझीलंडच्या 400 धावा फलकावर लागल्या. विलियम्सन आणि निकोल्स यांनी तिसऱ्या गड्यासाठी त्रिशतकी भागीदारी 420 चेंडूत झळकवली.
खेळाच्या शेवटच्या सत्राला प्रारंभ झाला आणि विलियम्सनने आपले द्विशतक 285 चेंडूत 22 चौकार आणि 2 षटकारासह झळकवले. त्याने निकोल्ससमवेत तिसऱ्या गड्यासाठी 350 धावांची भागीदारी 459 चेंडूत पूण केली. न्यूझीलंडच्या 500 धावा 115.1 षटकात फलकावर लागल्या. निकोल्सने आपले दीडशतक 212 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकाराच्या मदतीने पूर्ण केले. त्यानंतर निकोल्सने आपले द्विशतक 240 चेंडूत 4 षटकार आणि 15 चौकाराच्या मदतीने झळकवले. निकोल्सचे शतक पूर्ण झाल्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावाची घोषणा केली. न्यूझीलंडने 123 षटकात 4 बाद 580 धावांचा डोंगर उभा केला. या शेवटच्या सत्रामध्ये जयसुर्याने विलियम्सनला बदली खेळाडू मेंडीसकरवी झेलबाद केले. त्याने 296 चेंडूत 2 षटकार आणि 23 चौकारासह 215 धावा जमवल्या. रजिताने स्वत:च्याच गोलंदाजीवर मिचेलला 17 धावावर टिपले. ब्लंडेल 17 धावावर नाबाद राहिला. लंकेतर्फे रजिताने 2 तर धनंजय डिसिल्वा व जयसुर्या यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. विलियम्सनचे कसोटीतील हे सहावे द्विशतक आहे. त्यानंतर निकोल्सने कसोटी क्रिकेटमधील आपली वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. न्यूझीलंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका डाव्यात दोन फलंदाजांनी द्विशतक झळकवली आहेत.
दुसऱ्या दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी 17 षटकांमध्ये लंकेने 2 बाद 26 धावा जमवल्या. मॅट हेन्रीने ओशादा फर्नांडोला 6 धावावर झेलबाद केले. त्यानंतर ब्रेसवेलने कुशल मेंडीसला खाते उघडण्यापूर्वी कॉन्वे करवी झेलबाद केले. कर्णधार करुणारत्ने 16 तर जयसुर्या 4 धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडतर्फे हेन्री आणि ब्रेसवेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. लंकेचा 554 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे आठ गडी खेळावयाचे आहेत. या कसोटीत न्यूझीलंडची स्थिती भक्कम असून आता ते ही कसोटी मालिका एकतर्फी जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.
न्यूझीलंड प. डाव 123 षटकात 4 बाद 580 डाव घोषित (विलियम्सन 215, निकोल्स नाबाद 200, कॉन्वे 78, लॅथम 21, मिचेल 17, ब्लंडेल नाबाद 17 रजिता 2-126, डिसिल्वा 1-75, जयसुर्या 1-86), लंका प. डाव 17 षटकात 2 बाद 26 (ओशादा फर्नांडो 6, करुणारत्ने खेळत आहे 16, कुशल मेंडीस 0, जयसुर्या खेळत आहे 4, हेन्री 1-15, ब्रेसवेल 1-1).









