स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करण्याचा निर्णय
बेळगाव : स्मार्ट सिटीच्या कामांच्या विरोधात मनपाच्या सभागृहात जोरदार चर्चा करण्यात आली. स्मार्ट सिटीचे अधिकारी कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत, असा आरोप बहुसंख्य नगरसेवकांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये केला. यासाठी स्मार्ट सिटी, सार्वजनिक बांधकाम खाते यांची संयुक्त बैठक घेऊन त्याठिकाणी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत तसा ठरावदेखील करण्यात आला आहे. शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर अनेक ठिकाणी कामे करण्यात आली आहेत. मात्र ती कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. सीडी वर्कबाबत सर्वच नगरसेवकांनी तक्रारी केल्या आहेत. गटारी योग्यप्रकारे नाहीत. त्याचबरोबर सीडीवर्कदेखील केलेले नाही. याबाबत स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडे विचारले असता महापालिकेकडे ते बोट करत आहेत. तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता स्मार्ट सिटीकडे बोट करत आहेत. त्यामुळे आम्ही जनतेला काय उत्तर देऊ? असा प्रश्न बहुसंख्य नगरसेवकांनी सभागृहामध्ये केला आहे.
स्मार्ट सिटीची काही कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्याची जबाबदारी महापालिकेकडे सोपविली तरी त्या कामांच्या दुरुस्तीचे काम अजूनही स्मार्ट सिटीकडेच असल्याचे अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी सांगितले. मात्र नगरसेवकांनी त्यावर जोरदार आक्षेप घेत कोणती कामे पूर्ण झाली आहेत, तसेच त्या कामांच्या दुरुस्तीचे काम कोणाकडे आहे, याचा संपूर्ण अहवाल आम्हाला द्यावा, अशी मागणी केली आहे. स्मार्ट सिटीचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मात्र त्यांच्याकडे कामांबाबतची माहितीच नव्हती. त्यामुळे बैठकीला कशासाठी आला आहात? असा प्रश्नदेखील त्यांना विचारला. त्यामुळे नगरसेवक रवी साळुंखे यांनी स्वतंत्र बैठक घेऊनच स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची ओळख करून द्यावी, जेणेकरून आम्हाला त्यांच्याकडे तक्रारी नोंदविता येतील, असे त्यांनी सांगितले. नाथ पै सर्कल ते खासबाग बसवेश्वर सर्कलपर्यंतच्या गटारींचे कामही योग्य पद्धतीने केले नसल्याचे त्यांनी यावेळी सभागृहात सांगितले. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत नगरसेविका, नगरसेवक यांनी जोरदार आक्षेप घेतला. याचबरोबर एलअॅण्डटी कंपनीच्या विरोधातही तक्रारी केल्या आहेत. महापौर शोभा सोमणाचे यांनी नगरसेवकांचे म्हणणे ऐकून लवकरच स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असे सभागृहात सांगितले.









