सेल्फी पॉईंट उभारणीसह सह्यांची मोहीम
बेळगाव : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून वेगवेगळे उपक्रम राबवून प्रचार केला जात आहे. यासाठी प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये सेल्फी पॉईंट उभारला आहे. त्यासोबत मतदारांच्या स्वाक्षऱ्यांची मोहीमही राबविण्यात येत आहे. तसेच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जागृती फलक लावण्यात आले आहेत. येथील जि. पं., ता. पं., जिल्हाधिकारी कार्यालय, उपनोंदणी कार्यालय, सहकार खाते आदी ठिकाणी मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करणारे फलक लावले आहेत. सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून स्थानिक क्रीडापटूंसह देशपातळीवरील क्रीडापटूंची छायाचित्रे लावली आहेत. तसेच देशातील सांस्कृतिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसास्थळांची छायाचित्रेही लावण्यात आली आहेत. एकूणच निवडणूक आयोगाने सूचना केल्यानुसार स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान टक्का वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. जिल्हास्तरीय स्वीप समितीच्या माध्यमातून पथनाट्या जागृतीपथक तसेच मतदान कमी झालेल्या मतदान केंद्राच्या सेक्टर अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदानाची जागृती केली जात आहे. निर्भयपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून नागरिकांमध्ये जागृती करून मतदानाचा हक्क व मतदान का करावे? याची माहिती दिली जात आहे. एकूणच यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांसह सरकारी अधिकाऱ्यांकडून परिश्रम घेतले जात आहेत.









