तीन वर्षांच्या तुलनेत अधिक गुन्हे दाखल : मोठ्या प्रमाणात मुद्देमालही जप्त
बेळगाव : नशामुक्त बेळगावसाठी अमलीपदार्थांचे विक्रेते व त्याचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. गेल्या तीन वर्षातील कारवाईचा आलेख लक्षात घेता चालू वर्षी अमलीपदार्थांविरुद्ध पोलिसांनी मोहीम तीव्र केल्याचे जाणवते. याबरोबरच मटका बुकींविरुद्धही पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू ठेवला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर मटका, जुगार व अमलीपदार्थ विकणारे व त्याचे सेवन करणारे यांच्याविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. संपूर्ण पोलीस यंत्रणाच सध्या नशेबाजांच्या मुसक्या आवळण्यात गुंतली आहे. सोमवारी पोलीस आयुक्तांनी दिलेली आकडेवारी लक्षात घेता चालू वर्षी कारवाईने जोर धरल्याचे दिसून येते.
20 गुन्हे दाखल
चालू वर्षी 13 जुलैपर्यंत अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 42 जणांना अटक करून 6 लाख 23 हजार 240 रुपये किमतीचे 17 किलो 232 ग्रॅम 552 मिली अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. गांजाचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध 21 गुन्हे दाखल करून 23 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 2023 मध्ये 23 गुन्हे दाखल करून 34 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून 12 किलो 679 ग्रॅम अमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत 5 लाख 71 हजार 243 रुपये इतकी होते. गेल्या वर्षी 2024 मध्ये अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध 25 गुन्हे दाखल करून 39 जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याजवळून 10 लाख 68 हजार 950 रुपये किमतीचे 11 किलो 788 ग्रॅम 844 मिली अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
बडे मासे कधी गळाला लागणार
अमलीपदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध गेल्या वर्षी 30 गुन्हे दाखल करून 40 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यंदा साडेसहा महिन्यातच 20 गुन्हे दाखल झाले आहेत. डिसेंबरपर्यंत गुन्ह्यांची संख्या व आरोपींची संख्याही वाढणार आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईच्या सपाट्यामुळे अमलीपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. मात्र, सध्या सुरू असलेली कारवाई किरकोळ विक्रेत्यांवर सुरू आहे. बेळगाव परिसरातील अमलीपदार्थांच्या विक्री प्रकरणातील बडे मासे कधी गळाला लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.










