मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांची ग्वाही : सायकल फेरीनंतर मराठा मंदिर येथे सभेचे आयोजन
बेळगाव : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून आजतागायत सीमावासियांनी आंदोलने, सत्याग्रह, मोर्चे, मेळावे घेतले. परंतु, अद्यापही मराठी भाषिकांना आपल्या न्याय्य हक्कासाठी झुंजावे लागत आहे. मागील 67 वर्षांपासून दाखविलेली एकी यापुढील काळातही दाखवावी लागणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी दिली. म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या निषेध फेरीनंतर मराठा मंदिर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये सीमावासियांना मार्गदर्शन करताना अष्टेकर यांनी सध्याचा न्यायालयीन लढा, रस्त्यावरील लढाई याविषयी तरुणाईला मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, शहर म. ए. समितीचे बी. ए. येतोजी, म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, अॅड. अमर येळ्ळूरकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. एम. चौगुले उपस्थित होते.
भाजपकडूनच सर्वाधिक अन्याय
2004 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला. परंतु, तेव्हापासूनच कर्नाटक सरकारने कन्नडसक्ती अधिक तीव्र केली. बेळगावमध्ये अधिवेशन घेणे, विश्व कन्नड साहित्य संमेलनाचे आयोजन, हलगा येथे सुवर्णविधानसौधची निर्मिती करून बेळगाववर आपला हक्क आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचवेळी महाराष्ट्र सरकारकडून कर्नाटक सरकारचा निषेध करणे गरजेचे होते. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोळेझाक केल्यामुळेच सीमावासियांवर अत्याचार वाढले. त्यामुळे भाजप सरकारच्या काळातच सीमावासियांवर सर्वाधिक अन्याय झाला, असा घणाघात माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केला. रणजित चव्हाण-पाटील यांनी आभार मानत दडपशाहीतही सायकल फेरी यशस्वी केल्याबद्दल सीमावासियांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव पाटील यांनी केले. सभेला मोठ्या संख्येने सीमाबांधव उपस्थित होते.
मराठा आंदोलनाला पाठिंबा…
महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर त्याचा फायदा सीमाभागातील मराठा समाजाला होणार आहे. त्यामुळे या आंदोलनाला म. ए. समितीच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. नागरिकांनीही टाळ्यांचा कडकडाट करत ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत आंदोलनाला सीमावासियांचा पाठिंबा दिला.









