खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांची माहिती : व्यापारी-स्थानिकांची बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील गुन्हय़ांचा आलेख कमी आहे. येथील अधिकाऱयांनी तत्परतेने कार्य केले आहे. यापुढेही असेच आमचे प्रयत्न राहतील. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यापुढे कोणत्याही समस्या असल्यास त्या पोलिसांना सांगाव्यात, असे आवाहन खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांनी केले.
समादेवी गल्ली येथील समादेवी मंदिरच्या कै. श्री नरहरी शिवरामशेठ नार्वेकर सभागृहात जनसंपर्क बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येणाऱया क्यापारी व स्थानिक नागरिकांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर वाहतूक विभागाचे एसीपी शरणाप्पा, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आर. बी. सौदागर आदी उपस्थित होते.
खडेबाजार ही ग्राहकांसाठी मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळेच येथे गोवा, महाराष्ट्र आदी ठिकाणांहून ग्राहक येत असतात. त्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. अशा परिस्थितीत चोरी, पाकिटमारीच्या घटना घडतात. त्याची माहिती पोलिसांना दिल्यास तपास कामासाठी सोयीचे ठरणार आहे. काकतीवेस ते कंबळीखुटपर्यंत व्यापाऱयांनी सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गुन्हय़ांचा आलेख कमी आहे. नागरिकांचे सहकार्य आहे. येथील रहदारीची समस्या कायम असून ती सोडविण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
डीजेचा दणदणाट थांबवा : पुष्पा समर्थ
येथील स्थानिक महिला नागरिक पुष्पा समर्थ यांनी डीजेमुळे आमच्या कानठळय़ा बसत आहेत. त्यामुळे डीजेवर आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज पुष्पा समर्थ यांनी व्यक्त केली. यावेळी एसीपी ए. चंद्राप्पा यांनी यापुढे कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे आश्वासन दिले.
नागरिकांनी मांडल्या पार्किंगच्या तक्रारी
मुख्य बाजारपेठ असली तरी रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे बैठे व्यापाऱयांबरोबरच इतर व्यापाऱयांनाही याचा मोठा त्रास होत आहे. ग्राहक येण्यासही जागा नसते. त्यामुळे येथील पार्किंगला शिस्त लावून व्यापाऱयांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी खडेबाजार मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील नायक यांच्यासह इतर व्यापाऱयांनी केले.









