खासदार जगदीश शेट्टर यांची क्रेडाई सदस्यांना ग्वाही : क्रेडाई बेळगावची मासिक सभा उत्साहात
बेळगाव : सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास बेळगावच्या विकासाला गती येईल, या दृष्टीने आपण प्रयत्नशील असून बेळगावच्या विकासासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून पाठपुरावा करत आहोत, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले. क्रेडाई बेळगावची मासिक सभा शनिवारी पार पडली. यावेळी क्रेडाई सदस्यांनी शहरातील विविध प्रश्नांवर खासदार शेट्टर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी शेट्टर यांनी ही माहिती दिली. व्यासपीठावर व्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी, सचिन कळ्ळीमनी, सुधीर पानारे, आनंद कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी राजेंद्र मुतगेकर, पंचाक्षरी हिरेमठ, करुणा हिरेमठ, अभिषेक मुतगेकर यांचा खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खासदार शेट्टर म्हणाले, वंदेभारत व बेळगाव-रायचूर हायवे आणि शहरातून गेलेल्या रेल्वेसेवेचा आपण विकास केला. बेळगाव-धारवाड रेल्वे लाईनची अनेक वर्षांपासूनची मागणी असून दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांनीही यासाठी प्रयत्न केले. ही मागणी पूर्ण होण्यासाठी आपण अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.
सांबरा विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यासाठी नवी टर्मिनल उभारण्यात येत आहे. क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी यांनी हलगा, एसटीपीचे काम 2016 पासून रखडलेले काम व रिंगरोड पूर्ण करावा, या मागणीची दखल घेऊन खासदार शेट्टर यांनी लवकरच हे प्रकल्प पूर्ण होतील, अशी ग्वाही दिली. राजेंद्र मुतगेकर यांनी हिडकलचे पाणी धारवाडला न देता प्रथम बेळगावला आठवड्यातून नव्हे तर दोन-तीन दिवसांतून पाणी मिळावे, अशी मागणी केली. याप्रसंगी क्रेडाईचे उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी, सहसचिव सचिन कळ्ळीमनी, खजिनदार सुधीर पानारे, क्वेस नुराणी, चैतन्य कुलकर्णी, चेंबरचे अध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी, रमेश तुपची, कुलदीप हंगीरगेकर, राजेश हेडा, सिद्धाप्पा पुजारी व रमेश तुपची, पी. एस. हिरेमठ, महिला शाखेच्या अध्यक्षा करुणा हिरेमठ, नुरिया शेख, सीमा हुलजी, राजश्री मुतगेकर, अरुंधती पानारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रायोजकत्व जेएसडब्ल्यू आणि बेंच मार्क यांनी स्वीकारले होते.









