पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
पॅराशूट उघडली जाते तेव्हाच काम करते तशाच पद्धतीने तुमचे मन उघडे ठेऊन सदैव सकारात्मकतेकडे पहा. तुम्ही काहीही करू शकता पण सर्वकाही करू शकत नाहीत याचे भान ठेवा व त्यासाठी अमर्याद व्याप्ती असलेली सर्वोत्तमतेची शिडी चढा, अशक्य ते शक्य करून दाखवण्यासाठी प्रयत्नरत राहा, चुकीतून अधिक जास्त शिकण्याची मानसिकता ठेवा, संधीचे दरवाजे तुमच्यासाठी आपोआप खोलले जातील, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ, गोमंतकीय सुपूत्र डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
भाऊसाहेब बांदोडकर यांच्या 50 व्या पुण्यतिथीनिमित्त राज्य सरकारतर्फे आयोजित ‘एक प्रभावशाली प्रेरणास्रोत म्हणून नवभारताची निर्मिती’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उपस्थिती होती. त्याशिवाय बांदोडकर कुटुंबातील ज्योती बांदेकर, यतीन काकोडकर, समिर काकोडकर आणि अन्य सदस्य उपस्थित होते. अन्य मान्यवरांमध्ये खासदार सदानंद तानावडे, रमाकांत खलप, डॉ. सतीश शेट्यो, धर्मा चोडणकर, डॉ. सहानी, मनोज कामत, सुभाष वेलिंगकर, मुख्यमंत्र्यांची कन्या पार्थवी सावंत आदींची उपस्थिती होती.
भारताला संधींचाही देश बनविण्याचे आव्हान स्वीकारावे
पुढे बोलताना डॉ. माशेलकर यांनी, अमेरिकेला संधींचा देश म्हणून ओळखतात, तर भारताला ‘नवकल्पनांचा देश’ म्हणून ओळखतात. भारताकडे अफाट बुद्धीमत्ता आहे. त्यामुळे कल्पनांचा देश ही ओळख पुढे नेताना आता ‘भारत हा संधींचाही देश’ असल्याची नवी ओळख निर्माण करण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे, आणि आम्हीही ते करू शकतो हेच जगाला दाखवून दिले पाहिजे, असे सांगितले.
शिक्षण हेच भवितव्य
विज्ञानातील सर्वात प्रभावी इक्वेशन म्हणजे शिक्षण हेच भवितव्य आहे. 17 मार्च 2000 या दिवशी राष्ट्रपती भवनमध्ये पद्म पुरस्काराचे वितरण होणार होते. माझ्यासह उद्योगपती रतन टाटा यांना हा पुरस्कार प्राप्त झाला होता. राष्ट्रपती के. आर नारायणन यांच्याहस्ते तो देण्यात येणार होता. नारायणन हे अत्यंत गरीब कुटुंबात जन्मले होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे पालकांना शक्य होत नव्हते. तरीही त्यांनी महप्रयत्नांनी उच्च शिक्षणापर्यंत मजल मारली. पुढे त्यांना टाटा स्कॉलरशीप मिळाली आणि ते राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचले. अशीच स्थिती माझ्याही घरची होती. वयाच्या 6व्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले. त्यामुळे कुटुंबाचा भार एकट्या आईवर आला. काही वर्षांनंतर तिने मला मुंबईला नेले. जीवन अत्यंत कठीण होते. अक्षरश: रस्त्याशेजारील वीजखांब्यांखाली बसून अभ्यास केला. 11वी उत्तीर्ण झालो तेव्हा मलाही टाटा स्कॉलरशीप मिळाली. यातील मर्म म्हणजे जी व्यक्ती टाटांची स्कॉलरशीप मिळवून मोठी झाली तिच्याच हस्ते खुद्द टाटांनाच पद्म पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावरून एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे शिक्षण हेच सर्वश्रेष्ठ आहे, असे माशेलकर यांनी सांगितले.
हाच सिद्धांत घेऊन भाऊसाहेब वावरत होते. म्हणूनच शिक्षणासंबंधी त्यांना तळमळ होती व त्यातूनच त्यांनी खेडोपाडी असलेली निरक्षरता घालवून तळागाळातील माणसाला साक्षर करण्याच्या दृष्टीने शिक्षणाचे महान कार्य हाती घेतले. त्यांचे हे कार्य अतुलनीय असेच आहे. सध्या ते आमच्यात नसले तरी ते सर्वांच्या हृदयात आहेत, हेच आजच्या उपस्थितीवरून दिसून येते. भाऊसाहेब हे महान व्यक्तिमत्त्व प्रत्यक्षात मात्र एका संस्थेसारखे होते, असे माशेलकर म्हणाले.
शिक्षण ही एक संधीही आहे. तिला सामोरे जा, तिचा लाभ घ्या. सर्वोत्तमतेची शिडी चढा, ही शिडी अमर्याद आहे. अशक्य ते शक्य करून दाखवण्यासाठी प्रयत्नरत राहा. रोज सकाळी उठल्याबरोबर आज आपण स्वत:साठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी काय चांगले करणार आहात त्याचा विचार करा. अशक्य ते शक्य करून दाखविण्यासाठी प्रयत्नरत राहा, असे डॉ. माशेलकर यांनी शेवटी सांगितले.
शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी स्वागत व मान्यवरांची ओळख करून दिली. डॉ. अजय वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. माशेलकर यांना पारंपरिक समई भेट देऊन गौरविण्यात आले.









