मयुर चराटकर
बांदा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गापासून अगदी जवळ, सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली क्षेत्रफळवाडी नजीकच्या जंगलात पट्टेरी वाघाच्या दर्शनाने मोठी खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या अगदी बाजूला असलेल्या एका खडकावर हा भव्य पट्टेरी वाघ दिसल्याने या भागातील त्याच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेली अनेक वर्षे या संवेदनशील नैसर्गिक पट्ट्याला ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ घोषित करण्यासाठी लढणाऱ्या पर्यावरण प्रेमींच्या संघर्षाला मिळालेले एक मोठे बळ आहे.
सावंतवाडी आणि माजगाव नजीकच्या या भागामध्ये मोठे राखीव जंगल आहे. या जंगलात पट्टेरी वाघाचा वावर असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये नेहमीच होत होती. मंगळवारी सकाळी रस्त्याने जाणाऱ्या काही प्रवाशांना हा पट्टेरी वाघ अत्यंत शांतपणे खडकावर बसलेला दिसला.हा क्षण कॅमेऱ्यात कैद होताच त्याची माहिती वेगाने पसरली आणि वनविभाग तसेच पर्यावरणप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या पट्ट्यातील वाघांचे वास्तव्य सिद्ध झाल्याने, येथील जैविक समृद्धी आणि वन्यजीव संरक्षण यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आता स्पष्ट झाली आहे.









