कोल्हापूर :
राज्यातील दूधाची मागणी, उत्पादन आणि त्या तुलनेत होणार पुरवठा पाहता भेसळयुक्त दूधाची निर्मिती होत असल्याची शक्यता आहे. अशा भेसळयुक्त दूधावर सरकारचे बारीक लक्ष आहे. दूधासह सर्वच पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी सरकार लवकरच कठोर पाऊले उचलणार आहे. जनतेला विषमुक्त अन्न देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजार समितीमधील कार्यालयाला भेट देत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीतर्फे मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापुरात शिक्षणासह कुस्तीचे धडे घेतले आहे. याकाळात कोल्हापूरचे सहकार क्षेत्राचाही अनुभव मिळाला. येथील अनुभव घेत कोल्हापूरप्रमाणेचे लातूरमध्येही सहकाराचे जाळे घट्ट केले. स्वातंत्र्यपुर्व काळापासुन देशात सहकारचे जाळे विस्तृत झाले आहे. सध्या राज्यातील अडचणीतील जिल्हा बँक उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बँक, विकास सेवा संस्थांचे यांत्रिकरण केले म्हणजे मनुष्यबळ कमी होणार असे नाही. कामात सुलभता यावी यासाठी यांत्रिकीकरण करण्यात येत आहे. पतसंस्थांचेही अनेक प्रश्न आहेत तेही सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, पतसंस्थांच्या अनेक प्रश्नांबाबत केवळ बैठका झाल्या. तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पतसंस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासह कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील–आसुर्लेकर यांनी सहकारी संस्था स्थापन करण्यास कोल्हापुरच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करावे अशी मागणी केली. जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांनी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. जिल्ह्याचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेतल्याशिवाय सहकारातील सत्ता मिळवता येत नाही. गोकुळ, जिल्हा बँक, कोल्हापूर, गडहिंग्लज बाजार समिती, शेतकरी संघ येथे राष्ट्रवादी सत्तेत असल्याचे सांगितले. शहराध्यक्ष आदिल फरास यांनी सहकार पंढरी असलेल्या कोल्हापूरला पाठबळ द्यावे, अशी मागणी केली.
- सहकार विकासाचा आड्डा व्हावा
स्वातंत्र्यपुर्व काळापासून सहकार चळवळ रुळलेली आहे. राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सहकाराच्या माध्यमातून आपल्याला माणसे जोडायची आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्र हे राजकारणाचा आड्डा न बनता तो विकासाचा आड्डा बनवा, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
- अपात्र कर्जमाफीमध्ये लक्ष द्यावे
जिल्हा बँकेची 112 कोटींची कर्जमाफी नाबार्डने अपात्र ठरवली आहे. यामुळे जिल्ह्यातील सहाशे विकास सेवा संस्था अडचणीत आल्या असुन त्या बुडण्याच्या मार्गावर आहेत. नाबार्ड याकडे दूर्लक्ष करत आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात 11 रोजी सुनावणी होत आहे. बँकेच्या अपात्र कर्जमाफीमध्ये सहकार मंत्री म्हणुन आपण लक्ष घालावे, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांनी केली.
- कोल्हापूरला लवकरच प्रशस्त कार्यालय
राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार कोल्हापूरच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरला पक्षाचे प्रशस्त असे कार्यालय उभारण्यासाठी जागा बघा असा आदेशही दिला आहे. त्यामुळे कोल्हापूरला लवकरच प्रशस्त असे कार्यालय होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.








