पाचगाव वार्ताहर
कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीला विरोध करण्यासाठी पाचगाव,आर के नगर, मोरेवाडी परिसरात गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी मध्ये शेजारील गावांचा समावेश करण्यात येणार आहे. या हद्द वाढीला विरोध करण्यासाठी पाचगाव,आर के नगर ,मोरेवाडी परिसरातील व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवत कडकडीत बंद पाळला.
गुरुवारच्या बंदमुळे नेहमी गजबजलेला आर के नगर मुख्य चौक सुनसान होता. सर्व व्यावसायिक उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळता परिसरातील सर्व व्यवहार ठप्प होते.
कोल्हापूर महानगरपालिकेने प्रथम शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते द्यावेत,कचरा उठाव वेळेवर करावा, नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा व्यवस्थित रित्या पुरवाव्यात त्यानंतर हद्द वाढीचा विचार करावा अशी मागणी करत कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीला विरोध असल्याचे माजी उपसरपंच संजय शिंदे यांनी सांगितले.









