वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) टीम इंडियाच्या दौऱ्यांदरम्यान कठोर निर्बंध लागू करण्यासाठी सज्ज झाले असल्याचा दावा क्रीडा वाहिनीच्या एका वृत्तातून करण्यात आला आहे. या वृत्तात असे म्हटले आहे की, बीसीसीआय दौऱ्यावर असताना खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत घालवण्यास जो वेळ मिळतो त्यावर मर्यादा आणेल. त्याचप्रमाणे खेळाडूंना सराव आणि सामन्यांदरम्यान स्वतंत्ररीत्या प्रवास करण्यावरही बंदी असेल.
45 दिवसांच्या दौऱ्याच्या बाबतीत खेळाडूंचे कुटुंबीय 14 दिवसांपेक्षा जास्त काळ त्यांच्यासोबत राहू शकत नाहीत, तर परदेशातील लहान दौऱ्यांमध्ये अत्यंत जवळचे कुटुंबीय एक आठवड्यापर्यंत सोबत राहू शकतात. वरील वृत्तानुसार, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी गेल्या शनिवारी मुंबईत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांना नवीन व्यवस्थेची माहिती देण्यात आली आहे.
टीम इंडियाला नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाकडून 3-1 असा निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला आणि लॉर्ड्सवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र होण्याची संधी त्यांनी गमावली. कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली त्यांच्या ऑस्ट्रेलियातील आणि एकूणच कसोटी क्रिकेटच्या 2024-25 हंगामातील अत्यंत निराशाजनक कामगिरीमुळे टीकेचे लक्ष्य बनलेले आहेत.
शर्मा (तीन सामने आणि पाच डावांत 6.20 च्या सरासरीने 31 धावा) आणि विराट कोहली (पाच सामन्यांत 23.75 च्या सरासरीने एका शतकासह 190 धावा) हे जास्त वेळ फलंदाजीही करू शकले नाहीत. विराट संपूर्ण मालिकेत ऑफस्टंप बाहेरच्या सापळ्यात सापडला. रोहित आणि कोहली यांच्यासाठी कसोटीचा 2024-25 चा हंगाम खूप वाईट गेला आहे. रोहितने 8 सामन्यांतील 15 डावांत 10.93 च्या सरासरीने फक्त 164 धावा केल्या, तर विराटने 10 सामनयातील 19 डावांमध्ये 22.87 च्या सरासरीने केवळ 382 धावा केल्या.









