बेळगाव : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील अनेक रस्ते बॅरिकेड्स लावून अडविण्यात आले होते. याचबरोबर वाहतूकही वळविण्यात आली होती. त्यामुळे वाहनचालकांना फेरा मारून जावे लागत होते. याचबरोबर काही भागांमध्ये वाहने पार्किंग करून मिरवणूक पाहण्यासाठी चालतच शहरामध्ये प्रवेश करावा लागत होता. यामुळे लहान मुले, वृद्ध आणि महिलांना त्याचा त्रास सहन करावा लागला. बेळगावची गणेश विसर्जन मिरवणूक ही दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते. त्यामुळे परजिल्ह्यातून पोलीस फौजफाटा मागविला जातो. याचबरोबर विविध राखीव पोलीस दलांनाही पाचारण करण्यात येते. गुरुवारी झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. प्रत्येक मंडळाबरोबर पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच पोलीस नियुक्त करून त्या मंडळांना पुढे नेण्याचे काम पोलिसांना करावे लागले.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी सर्व ती काळजी घेतली होती. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह इतर पोलीस अधिकारी या विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवून होते. अतिसंवेदन आणि संवेदनशील भागामध्ये सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विसर्जन मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
मनपाच्या मूर्तीने विसर्जनाची सांगता
गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी तब्बल 30 तास लागले. मागील वर्षापेक्षाही अधिक वेळ लागला असल्याचे सांगण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी हे त्याठिकाणी नजर ठेवून होते. वेळोवेळी त्यांनी सूचना करत समस्या सोडविल्या. त्यांच्यासोबत महापालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेच्या गणेशमूर्तीनेच विसर्जनाची सांगता करण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार मनपाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन शुक्रवारी रात्री 10.45 वाजता करून मिरवणुकीची सांगता केली. तत्पूर्वी राजहंस गल्ली अनगोळ, खडक गल्ली, चव्हाट गल्ली आणि गणाचारी गल्लींच्या सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
पोलीस उपायुक्तांची सिव्हिल हॉस्पिटलला भेट
विसर्जन मिरवणुकीसाठी आलेल्या एका पोलिसाची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याची माहिती पोलीस उपायुक्त जगदीश यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने हॉस्पिटलला भेट देऊन त्या पोलिसाची विचारपूस केली.
पोलीस आयुक्त यांची सीसीटीव्ही कंट्रोल रुमला भेट
विसर्जन मिरवणुकीवर तसेच रहदारीवर नजर ठेवण्यासाठी शहरांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. कंट्रोल रुमच्या माध्यमातून त्यावर पोलीस अधिकाऱ्यांची नजर होती. त्या कंट्रोल रुमची पाहणी पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी केली.









