प्रतिनिधी/ वास्को
पणजीतील पोलीस नियंत्रण कक्षाला विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी फोन आल्याने दाबोळी विमानतळावरही खळबळ उडाली. स्थानिक पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व दहशतवाद विरोधी पोलिसांच्या पथकाने विमानतळाच्या आवारात व कानाकोपऱ्यात कडक तपासणी केली. मात्र, कडक तपासणी करूनही संशयास्पद असे काहीच आढळून आले नाही.
वास्कोचे पोलीस उपअधीक्षक सलिम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार पणजीच्या पोलीस नियंत्रण कक्षाला विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची माहिती शनिवारी संध्याकाळी मिळाली. त्यामुळे खबरदारी म्हणून सुरक्षा यंत्रणांनी दाबोळी विमानतळावर धाव घेतली. एटीएसचे पथक श्वानांसह घटनास्थळी दाखल झाले. सर्वत्र तपासणी करण्यात आली. मात्र, कुठेही संशयास्पद असे काहीच आढळून आले नाही. दाबोळी विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा यापूर्वीही निनावी फोनद्वारे पसरविण्यात आल्या होत्या व स्थानिक सुरक्षा यंत्रणांना काही तास धावपळ करावी लागली होती.