गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींचे उद्गार : 5941 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर पोहोचले. तेथे त्यांनी प्रथम अंबाजी मंदिरात जात पूजा केल्यावर मेहसाणा जिल्ह्यातील खेरालू येथे सुमारे 5941 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले आहे. यानंतर त्यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना गुजरात आणि देशाच्या विकासासाठी गुजरातींचे आभार मानतो असे उद्गार काढले आहेत. भारत चंद्रावर पोहोचल्याने आणि जी-20 परिषदेच्या आयोजनामुळे जगभरात भारताच्या विकासाची चर्चा होत आहे. पूर्ण बहुमत असल्यानेच सरकारला देशहिताचे निर्णय घेता येत असल्याचे मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.
जी-20 परिषदेदरम्यान जगातील मोठे नेते भारताच्या कानाकोपऱ्यात गेले आणि भारतीयांची संकल्पशक्ती पाहून चकित झाले. आज पूर्ण देशात पायाभूत विकास होत आहे, काही वर्षांपूर्वी याच्या खुणाही दिसून येत नव्हत्या. देशात आता मोठमोठे प्रकल्प आकार घेत आहेत. पूर्ण बहुमतातील सरकार असल्याने देशहिताकरता मोठमोठे निर्णय घेतले जात असल्याचे मोदी म्हणाले.
उत्तर गुजरातचे चित्रच बदलले
एकेकाळी उत्तर गुजरातमध्ये दुष्काळ असायचा. येथील माताभगिनींना दिवसभर पाण्यासाठी कित्येक मैल वाट तुडवावी लागत होती. परंतु आता येथील घरोघरी नळ आहे. आज येथील लोकांसाठी केवळ पिण्यासाठी नव्हे तर सिंचनासाठी देखील पूर्णवेळ पाणी आहे. एकेकाळी येथून केवळ दूधाचा व्यापार व्हायचा, परंतु आता येथून देशभरात कापूस, धान्य आणि भाज्या पाठविण्यात येत आहेत. बनासकांठा येथे मेगा फूड पार्क विकसित करण्यात येत असल्याचे वक्तव्य मोदींनी केले आहे.
राष्ट्रीय एकता दिन
31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी हे नर्मदा जिल्ह्यातील केवडियामध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर पुष्पांजली अर्पण करतील, ज्यानंतर राष्ट्रीय एकता दिन समारंभात ते सहभागी होणार आहेत. एकता दिनाच्या संचलनात बीएसएफ आणि विविध राज्यांचे पोलीस पथक सामील होणार आहे. यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते एका रुग्णालयाच्या निर्मितीकार्याचा शुभारंभ केला जाणार आहे.









