खोटे संदेश पाठवून धमकावणाऱ्यांना केंद्र सरकारचा दणका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रवासी विमानांमध्ये बाँब ठेवण्यात आला आहे, असे खोटे संदेश पाठवून घबराट निर्माण करणाऱ्या आणि विमान कंपन्यांची हानी करणाऱ्या कॉलर्स (हॉक्सर्स) विरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. असा संदेश पाठविणाऱ्यांचा विमान प्रवास करण्याचा अधिकार काढून घेण्यात येणार आहे. त्यामुळे असे उद्योग करणाऱ्यांना पुढे कधीही विमान प्रवास करता येणार नाही.
यासाठी विमान संरक्षण नियमांमध्ये परिवर्तन करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात 100 हून अधिक विमानांना, त्यांची उ•ाणे झाल्यानंतर असा संदेश सोशल मिडियावरुन देण्यात आला होता. त्यामुळे या विमानांचे जवळपासच्या विमानतळांवर अवतरण करावे लागले होते. परिणामी, विमान प्रवासाचे वेळापत्रक अस्ताव्यस्त होऊन विमान कंपन्यांची आर्थिक हानीही मोठ्या प्रमाणात झाली होती.
प्रमाण कमी, पण…
नोव्हेंबरमध्ये असे प्रकार वारंवार होत असताना केंद्र सरकारने केलेल्या त्वरित कारवाईमुळे अनेक बनावट संदेश देणाऱ्यांना शोधून काढण्यात यश आले होते. त्यांच्यावर कारवाईही केली जात आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात अशा बनावट इशाऱ्यांचे प्रमाण कमी झाले असून विमान वाहतूक सुरळीत झाली आहे. तथापि, अद्यापही अशा घटना घडत असल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
नियमांमध्ये परिवर्तन करणार
अशी कठोर कारवाई करणे सुलभ व्हावे यासाठी, नागरी विमानवाहतूक नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. निश्चितपणे नजीकच्या भविष्यकाळात हे नियम सुधारण्यात येतील आणि विमान प्रवास अधिकाधिक सुरक्षित आणि सुखाचा करण्यात येईल. प्रवाशांना कोणत्याही असुविधेला सामोरे जावे लागू नये, म्हणून योग्य ती उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिले.
सूत्रधारांचा भांडाफोड करणार
असे बनावट धमकीचे कॉल्स कोण करते आणि त्यापाठीशी त्यांचा सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेतला जात आहे. हे सूत्रधार लवकरच पोलिसांच्या हाती लागतील आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर करवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्र सरकारने असे अज्ञात कॉल करणाऱ्यांविरोधात व्यापक अभियान छेडले असून इंटरनेटच्या माध्यमातूनच त्यांचा शोध घेतला जाणार आहे.
नियमात कोणता बदल होणार
सध्याच्या विमान प्रवासाच्या नियमानुसार विमानात बाँब ठेवल्याचा संदेश मिळताच, विमान नजीकच्या विमातळावर उतरवावे लागते. विमानाची कसून तपासणी करावी लागते. हे काम करण्यासाठी कित्येकदा आठ ते दहा तासही लागू शकतात. या वेळेत प्रवाशांचे वास्तव्य, भोजन आणि सुरक्षा यांची व्यवस्था विमान कंपन्यांना करावी लागते. यासाठी बराच खर्च करावा लागतो. तसेच विमान प्रवाशांच्या मनात भीती बसल्याने विमान वाहतूक व्यवस्था तोट्यात जाऊ शकते. हे घडू नये, म्हणून नियमात सुधारणा केली जाणार आहे. उ•ाण केलेल्या विमानाला धमकीचा दूरध्वनी आल्यास विमान जवळच्या विमानतळावर उतरविले जाणार नाही. ते तसेच त्याच्या गंतव्य स्थानी नेण्यात येईल. कॉलची त्वरित तपासणी केली जाईल आणि धोका नसल्यास विमान मध्येच उतरविले जाणार नाही. मात्र इशारा खरा असल्याची शक्यता असल्यास विमान उतरविले जाईल. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना धोका होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, अशी माहिती आहे.









