आमदार दाजी साळकर यांची मागणी, कार्यकर्त्यांसह घेतली पोलीस उपअधीक्षकांची भेट
प्रतिनिधी/वास्को
बायणा किनाऱयावरील हनुमान मंदिरातील पुजारी आणि त्यांच्या सेवेकऱयांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी अद्याप कठोर भुमिका घेतलेली नसल्याने या प्रश्नावर अद्याप असंतोष कायम आहे. बुधवारी सकाळी वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसमवेत या प्रश्नी पोलीस उपअधीक्षकांची भेट घेऊन पोलिसांच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करून मारहाणीत गुंतलेल्यांविरूध्द कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. येत्या चार दिवसांत त्या संशयीतांविरूध्द कारवाई करण्याची मागणी आमदार व कार्यकर्त्यांनी केली आहे.
मंदिरातील पुजारी आणि त्यांच्या सेवेकऱयांवर शुक्रवारी रात्री हल्ला झाला होता. मात्र, पोलिसांनी त्यांच्याविरूध्द किरकोळ कारवाई करून प्रकरण बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांच्या या कृतीविरूध्द वास्को व मुरगावमधील धर्माभिमानी कार्यकर्त्यांमध्ये या प्रकरणाला पाच दिवस उलटली तरी नाराजी कायम आहे. पोलिसांनी त्या युवकांविरूध्द अधीक कडक कारवाई हाती न घेतल्यास पुढील कृती ठरवण्यात येईल असा ईशारा विहीप व अन्य कार्यकर्त्यांनी दिलेला असला तरी पोलिसांनी अद्याप काहीच कृती केलेली नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी आमदार दाजी साळकर व त्यांचे बरेच कार्यकर्ते वास्को पोलिसस्थानकावर पोहोचले. त्यांनी पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांची भेट घेतली. यात रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, नगरसेवक गिरीष बोरकर, ऍड. राजीव ढवळीकर यांचाही समावेश होता. मंदिराचे पुजारी दत्तप्रसाद भट यावेळी उपस्थित होते.
पुन्हा दंगा मस्ती घडू लागल्यास बायणा किनाऱयावर कुणी फिरकणार नाही
यावेळी आमदारांनी व उपस्थित कार्यकर्त्यांनी पुन्हा त्या रात्री घडलेल्या घटनेचा पाढा वाचून पोलिसांच्या किरकोळ कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. व त्या युवकांविरूध्द पुन्हा कारवाईची मागणी केली. आमदार दाजी साळकर यांनी येत्या चार दिवसांत कारवाई करून पोलिसांनी लोकांच्या भावनांची कदर करावी अशी मागणी केली. तो गुन्हा अदखलपात्र नव्हता, तो दंगा होता. त्यंनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. त्या हिंसक कृतीविरूध्द कडक गुन्हे नोंद होण्याची आवश्यकता होती असे आमदार साळकर यांनी स्पष्ट केले. बायणा किनाऱयावर मंदिराच्या पुजाऱयांनी सुधारणा केलेली आहे. किनाऱयावर आता पर्यटक येत आहेत. मात्र, मारहाणीसारखे हिंसक प्रकार घडू लागल्यास या किनाऱयावर कुणी फिरकणार नाहीत असे ते म्हणाले. बायणा किनाऱयावर दंगा मस्ती सहन केली जाणार नाही असा संदेश पोलिसांच्या कारवाईतून गोवाभर पसरायला हवा असे मत आमदार साळकर यांनी व्यक्त केले.
वास्को मुरगाव पोलीस स्थानकाची हद्द पूर्वीसारखीच असावी
यावेळी पोलीस उपअधीक्षकांशी झालेल्या चर्चेत वास्को पोलीस स्थानक हद्दीतील बायणाचा भाग मुरगाव पोलीस स्थानकाशी जोडण्याच्या प्रकाराबाबत चर्चा झाली. हा प्रकार चुकीचा आहे. बारीक सारीक घटनांसाठीही बायणाच्या लोकांना हेडलॅण्ड सडापर्यंत प्रवास करावा लागत आहे. तसेच बायणात काही घडल्यास पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासही उशिर होतो. त्यामुळे आरोपी पळूनही जातात. त्यामुळे वास्को मुरगाव पोलीस स्थानकाची हद्द पूर्वीसारखीच करावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. पोलीस तक्रार करण्यासाठी गेलेल्या पुरोहित आणि त्यांच्या सहकाऱयांशी मुरगावचे पोलीस गैरवागल्याबद्दल निषेध व्यक्त करून संबंधीत पोलिसावर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आमदारांनी बायणा किनारी पोलीस चौकीची गरज व्यक्त केली
दरम्यान, आमदार दाजी साळकर यांनी बायणा किनाऱयावर पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली. या ठिकाणी पोलीस चौकी असायला हवी असेही ते म्हणाले. आपण बायणा किनाऱयावरील आवश्यकतांचा प्रश्न मुख्यमंत्रासमोरही मांडणार असल्याचे आमदारांनी म्हटले आहे.









