मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा इशारा
बेळगाव : राज्यात बनावट इन्व्हॉईस तयार करून जीएसटी गोळा करणाऱ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी व्यावसायिक खात्याने पाऊले उचलेली आहेत अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरूवारी विधान परिषदेत दिली. आमदार एम. नागराजू यांच्या चिन्हांकित प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. बनावट इन्व्हॉईस तयार करून कर संग्रह करण्याचा प्रयत्न केलेल्या 2437 कंपन्या सरकारच्या सापळ्यात अडकल्या आहेत. जीएसटी प्रकरणी बनावटगिरी रोखण्यासाठी सरकारमार्फत नेमणूक करण्यात आलेल्या राज्य व्यावसायिक खात्याच्या अधिकाऱ्यांनी 752 प्रकरणे नेंदविले आहेत. यापैकी 429 प्रकरणांचा निवाडा होणार आहे. उर्वरित प्रकरणे लेखा परिक्षण व तपास विभागात दाखल झाली आहेत. बनावट इन्व्हॉईस तयार करून कर वसुली करणाऱ्यावर राज्याच्या जीएसटी विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.









