कोल्हापूर :
फुटबॉल संघांच्या प्रतिनिधींनी फुटबॉल सामन्यावेळी प्रेक्षक गॅलरीतच थांबून रहावे, संघ व खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने सामना खेळावा, फुटबॉल सामन्यावऊन सोशल मीडियाद्वारे आक्षेपाहार्य पोस्ट व्हायरल केल्यास शिक्षा होणार, प्रेक्षक गॅलरीत गुटखा तंबाखू, मावा व पान खाऊन थुंकून दुर्गंधी पसरवू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कऊ नये, नियमबाह्य वर्तन करणाऱ्या संघ व खेळाडूंवर जास्तीत–जास्त कालावधीची कठोर कारवाई करावी, असे एकमुखी निर्णय केएसए पदाधिकारी, फुटबॉल संघ प्रतिनिधी व पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आले.
2024-25 च्या फुटबॉल हंगामाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू स्टेडियममधील केएसए कार्यालयात बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती हे होते. तसेच पोलीस प्रशासनाकडून शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी बोलताना संजीवकुमार झाडे म्हणाले, कोल्हापूरी फुटबॉल हंगाम व सामने पाहण्यासाठी होणारी गर्दी याला एकप्रकारचे कोल्हापूरचे वैभव म्हणावे लागेल. हे वैभव नव्या पिढीने जपले पाहिजे, पोलीस प्रशासनाची जबाबदारी समाजात कायदा व सुव्यवस्था राखणे आहे, मर्यादेमुळे पोलीसांची बंदोबस्तासाठी संख्या वाढवता येत नाही. तेव्हा आता संघ पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून वादावादी रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा. सामन्यात गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूवर कारवाईचा बडगा उगारला जाईल. तेव्हा आता खेळाडूंनी खिलाडूवृत्तीनेच खेळावे लागेल. सामन्यात होणाऱ्या वादावादीवेळी प्रेक्षकांनाही पाण्याची बॉटल्स व इतर हानिकारक साहित्य मैदानात फेकू नये. तसे आढळयास कारवाई अटळ आहे. तसेच सोशल मीडियावर चितावणीखोर स्टेटस ठेवत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या संघ व खेळाडूंवर कठोर कारवाई होणारच असेही झाडे यांनी सांगितले. अजित टिके म्हणाले, फुटबॉल सामन्यावेळी सातत्याने होणाऱ्या वादांमुळे कोल्हापूरचा फुटबॉल म्हणजे दंगा असे चित्र बनले आहे. हे चित्र प्रेक्षक व खेळाडूंनाच बदलावे लागेल. पोलीस बाहेरगावीही बंदोबस्तासाठी जात असल्याने फुटबॉल हंगामासाठी पुरेसा बंदोबस्त देता येत नाही. तेव्हा संघ व्यवस्थापनाने आपल्या संघाच्या सामन्यावेळी प्रेक्षक गॅलरीमध्ये जबाबदार व्यक्तींना बसवून वादावादी रोखण्याचा प्रयत्न करावा. स्पर्धा जिंकल्यानंतर संघांकडून ईर्ष्येपोटी विविध मार्गावऊन काढल्या जाणाऱ्या मिरवणूकीला पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळणार नाही. आपल्या भागातच मिरवणूक काढता येईल, असेही टिके यांनी सांगितले.
नियमांचे पालन करणे गरजेचे…!
मालोजीराजे छत्रपती म्हणाले, कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम शांततेत आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्वांनीच नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यंदाच्या हंगामातील सामन्यांमध्ये गैरवर्तन करणाऱ्या संघावर व खेळाडूवर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत कोणाचीही कारवाई कमी होणार नाही. सोशल मीडियाचा वापर एकमेकांना खुन्नस देण्यासाठी कऊ नये. संघ व्यवस्थापनानेच सामन्यात गैरवर्तन करणाऱ्या खेळाडू अथवा संघ समर्थकांना योग्य ती समज दिल्यास पुढील अनर्थ टाळता येईल. कोल्हापूरच्या फुटबॉलचे आकर्षण भारतभर आहे. हे आकर्षण वाढेल कसे हे पहाणे जऊरीचे आहे, असेही मालोजीराजे म्हणाले.








