200 रुपयांवरून तब्बल एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा शासनाचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन व धूम्रपान केल्यास कोटपा (सिगारेट अँड ऑदर टोबॅको प्रोडक्ट्स अॅक्ट) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या गुन्ह्याबद्दल आता सरकारने 200 रुपयांवरून तब्बल एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला असून, तसे सरकारी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. यासंबंधी धुम्रपान आणि तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार आणि वाणिज्य उत्पादन, पुरवठा आणि वितरणाचे नियमन) कर्नाटक कायदा सुधारणा 2024 ला परवानगी दिलेली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती कर्नाटक सरकारच्या अधिकृत परिपत्रकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्यात लहान वयोगटातील मुले व कॉलजचे विद्यार्थी यांच्यामध्ये तंबाखू आणि धुम्रपानचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच हुक्का आणि शिशा बारमध्ये लहान मुले आढळून आली आहेत. यावर नियंत्रण आणण्याकरिता 2023 मध्ये राज्य सरकारने या कायद्यात बदल करण्याचे निश्चित केले होते.
नवीन हुक्का बार स्थापनेला परवानगी नाही
आता नवीन सुधारीत कायद्यानुसार यामध्ये कलम 4 व कलम 4 अ असे दोन विभाग करण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी तंबाखूचे सेवन किंवा थुंकणे, धुम्रपान करणे यावर बंदी असेल. तसेच नवीन हुक्का बार स्थापनेला परवानगी नसणार व जेवणाची ठिकाणे, पब, बार, रेस्टॉरंट इतर कोणत्याही ठिकाणी वापरावर बंदी असणार आहे.
21 वर्षाखालील मुलांना तंबाखू खरेदी-विक्रीस बंदी
कलम 6 नुसार 21 वर्षाखालील मुलांना तंबाखू खरेदी आणि विक्री करणे, किंवा विकायला लावणे, सिगारेट खरेदी करण्यास सांगणे यावर बंदी असेल. कोणत्याही शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील 100 मीटर अंतरापर्यंत विक्री बंद असणार आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास कलम 21, 24 व 28 नुसार 1000 रुपये दंड आकारण्यात येईल. व 21 अ नुसार हुक्का, बार चालविल्यास तीन वर्षे कारावास व एक लाख रुपये दंड ठोठावण्यत येईल.









