सलग सुटीचा परिणाम, नागरिकांची गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
डॉ. आंबेडकर आणि महावीर जयंतीमुळे बँकांना दोन दिवस सुटय़ा आहेत. त्यामुळे एटीएमवर ताण वाढला आहे. तसेच ऑनलाईन व्यवहारही वाढले आहेत. गुरुवारी आंबेडकर जयंती, महावीर जयंती, शुक्रवारी गुड फ्रायडे यामुळे बँकांना सलग दोन दिवस सुटय़ा आहेत. त्यामुळे रोकडसाठी एटीएमवर अवलंबून रहावे लागणार आहे.
आठवडय़ात गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी बँकांना सुटी असल्याने आर्थिक उलाढालीवरही परिणाम होणार आहे. आठवडय़ात तीन-चार दिवस सुटी राहणार असल्याने आर्थिक व्यवहारही थंडावणार आहेत. शिवाय मोठी रक्कम पाहिजे असल्यास सोमवारपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
बँका बंद राहिल्याने रोकडसाठी शहरातील एटीएमवर गर्दी वाढली होती. पैसे काढण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी एटीएमवर ताण वाढला होता. आर्थिक व्यवहारासाठी बँका बंद राहिल्याने एटीएमसमोर नागरिकांची वर्दळ वाढलेली पहायला मिळाली.









