मंत्री सतीश जारकीहोळी : शोषित जागृती मेळाव्यात आवाहन
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली आज जागृती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. भविष्यामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र येऊन सिद्धरामय्या यांच्या समर्थनार्थ उभे राहून त्यांना बळ दिले पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. चित्रदुर्ग येथे शोषित जाती-जमाती महामेळावा आणि कर्नाटक राज्य मागासवर्गीय जाती मेळावा यांच्यातर्फे शोषित जागृती मेळाव्यामध्ये ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आमचे नेते आहेत. ते सत्तेवर आल्यानंतर अनेक राजकीय बदल झाले आहेत. यापूर्वी देवराज अर्स, बंगारप्पा मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात शोषित समाजासाठी अनेक उपक्रम राबवून बदल घडविला. त्याप्रमाणेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जनहिताच्या योजना राबवून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. गॅरंटी योजनांची अंमलबजावणी करून महत्त्वाची कामगिरी केली आहे. यासाठी त्यांना आणखी अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.









