इटलीच्या पंतप्रधानांकडून मोदींचे अभिनंदन :
वृत्तसंस्था/ रोम
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभा निवडणुकीतील सलग तिसऱ्या विजयाबद्दल अभिनंदन पेले आहे. तर मेलोनी यांच्या ट्विटला नरेंद्र मोदींनी प्रतिसाद दिला आहे.
तुमच्या शुभेच्छांसाठी आभार मानतो. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत मिळून भारत-इटली रणनीतिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. ही भागीदारी संयुक्त मूल्ये आणि हितांवर आधारित आहे. विश्वकल्याणसाठी मिळून काम करण्यासाठी तत्पर असल्याचे मोदींनी मेलोनी यांना उद्देशून म्हटले आहे.
दोन्ही देश विविध मुद्द्यांवर सहकार्य करतील. दोन्ही नेते मैत्री मजबूत करण्यासाठी मिळून काम करतील, यामुळे दोन्ही देशांमधील संबंध वृद्धींगत होतील असा पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया मेलोनी यांनी क्यक्त केली आहे.
अनेक जागतिक नेत्यांकडून शुभेच्छा
अन्य जागतिक नेत्यांनीही पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारला सलग तिसऱ्या निवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. नेपाळचे पंतप्रधान प्रचंड, श्रीलंकचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे अणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारा ट्विट केला आहे. 2024 च्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआचे अभिनंदन. दोन्ही देशांच्या संयुक्त हितसंबंधांना पुढे नेण्यासाठी मिळून काम करण्याकरता उत्सुक असल्याचे मोइज्जू यांनी नमूद केले आहे.









