2024 मध्ये विरोधी पक्ष एकजूट होणे गरजेचे
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षांच्या ऐक्याचा संदेश दिला आहे. ममतादीदींनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त धुलियानचा दौरा केला आहे. या दौऱ्यात एका सभेला संबोधित करताना त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकजूट होत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात लढण्याचे आवाहन केले आहे. तसेच भाजप तपास यंत्रणांच्या बळावर निवडणूक लढवू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
केंद्र सरकारला विनंती करूनही बंगालमध्ये गंगा नदीमुळे होणारी काठाची धूप रोखण्यासाठी मदत मिळत नाही. तपास यंत्रणा भाजपला मते मिळवून देण्यास मदत करणार नाहीत. काठाची धूप होत असल्याने हजारो लोकांचे जीवन प्रभावित होत असल्याचे ममतादीदी म्हणाल्या.
राजकारण, दंगल घडविण्याची आणि विद्वेष फैलावण्याची जितकी चिंता आहे तितकीच चिंता निसर्गाबद्दल असती तर हे बंगाल अधिक सुंदर असते असे म्हणत ममतादीदींनी केंद्रावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणांच्या नावावर लोकांना घाबरविण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नैसर्गिक आपत्ती वाढत आहेत, नदीची पाणीपातळी वाढली आहे. आम्ही वारंवार केंद्र सरकारशी चर्चा केली आहे, तरीही आम्हाला कुठलीच मदत करण्यात आलेली नाही. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत नदीकाठावरील धूप रोखण्यात येणार आहे. नदीकाठावर विशेष गवताची लागवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









