सीडीएस अनिल चौहान यांचे वक्तव्य : भारताची ढाल अन् तलवार ठरणार सुदर्शन चक्र
वृत्तसंस्था/ महू
मध्यप्रदेशच्या महू येथे आयोजित ‘रण संवाद’ चर्चासत्रात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी देशाची सुरक्षा रणनीति आणि भविष्यातील आव्हानांबद्दल स्वत:ची मते मांडली आहेत. भारताची नवी सुरक्षा प्रणाली ‘सुदर्शन चक्र’ देशाची ढाल अन् तलवार ठरणार आहे. सुदर्शन चक्र भारताच्या सामरिक, नागरिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थानांच्या सुरक्षेसाठी ढाल अन् अस्त्राचे काम करणार असल्याचे वक्तव्य चौहान यांनी केले आहे. तसेच शांततेसाठी सामर्थ्य आवश्यक असल्याची टिप्पणी सीडीएस चौहान यांनी केली आहे.
सुदर्शन चक्रला भारताचे गोल्डन डोम किंवा आयर्न ड्रोम संबोधिले जात आहे. सुदर्शन चक्र 2035 पर्यंत पूर्णपणे तैनात होणार आहे. ही प्रणाली शत्रूच्या हवाई हल्ल्यांचा शोध घेणे, ट्रॅक करणे आणि निष्प्रभ करण्यासाठी मजबूत यंत्रणेवर आधारित असेल. यात सॉफ्ट स्किल्स, कायनेटिक शस्त्रास्त्रs आणि डायरेक्ट एनर्जी वेपन्स असतील. ही प्रणाली भारताच्या सुरक्षा रणनीतिला नवी दिशा देईल, जी संरक्षणासोबत प्रत्युत्तरादाखल हल्ल्याची क्षमताही राखून असेल असे जनरल चौहान यांनी सांगितले आहे.
भारत शांततेचा पुरस्कर्ता
भारत नेहमीच शांततेचा समर्थक राहिला आहे. परंतु याचा अर्थ आम्ही शांततावादी आहोत असा नाही. शांतता कायम राखण्यासाठी सामर्थ्य आवश्यक आहे. शांतता हवी असल्यास युद्धासाठी तयार रहा या आशयाची एक लॅटिन भाषेतील म्हण आहे. याचमुळे सामर्थ्याशिवाय शांतता केवळ एक स्वप्न ठरते. ऑपरेशन सिंदूर एक आधुनिक संघर्ष होता, ज्यामूण्s अनेक महत्त्वपूर्ण धडे मिळाले. याप्रकरणी अनेक सुधार लागू करण्यात आले आहेत आणि काहींकरता काम सुरू आहे. रणसंवादाचा उद्देश ऑपरेशन सिंदूरवर चर्चा नव्हे तर भविष्याच्या रणनीतिंवर लक्ष देणे असल्याचे चौहान यांनी स्पष्ट केले.
तिन्ही दलांदरम्यान ताळमेळ
भविष्यातील युद्ध केवळ जमीन, सागर आणि आकाशापुरती मर्यादित राहणार नाहीत. तर सायबर आणि अंतराळ क्षेत्रांपर्यंत विस्तारित होतील. अशास्थितीत भारतीय भूदल, नौदल अणि वायुदलादरम्यान संयुक्त रणनीति आणि ताळमेळ आवश्यक आहे. जॉइंटमॅनशिप आता पर्याय नव्हे तर भारताच्या सैन्यसामर्थ्याचा आधार असल्याचे वक्तव्य चौहान यांनी केले.
आत्मनिर्भर व्हावे लागणार
सीडीएस चौहान यांनी विकसित भारताचा दृष्टीकोन अधोरेखित करत भारताला केवळ तंत्रज्ञान नव्हे तर विचार आणि व्यवहारातही ‘शस्त्र, सुरक्षित आणि आत्मनिर्भर’ व्हावे लागणर असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी समाजात युद्ध रणनीति आणि तंत्रज्ञानांबद्दल जागरुकता वाढविण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला आहे. डीआरडीओकडून करण्यात आलेल्या एकीकृत हवाई सुरक्षा अस्त्र प्रणलीच्या यशस्वी परीक्षणांचा उल्लेख करत भविष्यातील आव्हानांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डाटा आणि क्वांटम तंत्रज्ञानांचा वापर आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









